आपण आपुला वैरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:19 PM2018-12-13T12:19:41+5:302018-12-13T12:19:47+5:30

एक फोटोग्राफर होता़

We are your enemies | आपण आपुला वैरी

आपण आपुला वैरी

Next

एक फोटोग्राफर होता़ त्याच्याकडे एक मनुष्य फोटो काढण्यासाठी आला व तो त्याला म्हणाला, ‘मला फोटो काढायचा आहे़ पण माझा फोटो एकदम छान आला पाहिजे़ खराब फोटो आला तर पैसे मिळणार नाही.’ फोटोग्राफर म्हणाला, ‘फोटो चांगला येईल़ पण हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे़ तुमचा चेहरा जसा आहे़ तसाच येईल़ थोडाफार फरक मेकअप करून होईल व मी म्हणेल तसे तुम्ही मला पोज द्या.’ ‘ठीक आहे’, म्हणून त्या माणसाने सर्व तयारी केली आणि फोटोसाठी उभा राहिला़ मेकअप वगैरे छान केला होता़ फोटोग्राफरने त्याला पोज घ्यायला सांगितले़ त्याप्रमाणे तो उभा पण राहीला. कॅमेऱ्यामध्ये क्लिक करायचे तेवढ्यात त्या माणसाच्या नाकावर माशी बसली आणि त्याने ती माशी हाकलण्यासाठी म्हणून नाक हलवले़ त्याच क्षणी क्लिक झाले़ नंतर फोटो बघितला़ तर तो फोटो खूप विचित्र आला होता़ चेहरा सगळा वेडावाकडा झाला होता. तो माणूस फोटोग्राफरला म्हणाला, ‘अरे हे काय फोटो किती विचित्र आलाय?’ फोटोग्राफर म्हणाला, ‘यात माझा काहीही दोष नाही़ तुम्हीच नाक वाकडे केले. फोटो चांगला किंवा वाईट येणे हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असते़ अगदी तसेच मनुष्याच्या जीवनात चांगले अथवा वाईट होणे हे आपल्यावर अवलंबून आहे़ तुम्ही समोरच्या व्यक्तीबरोबर चांगले वागले की तो ही तुमच्याबरोबर चांगले वागतो. आपल्याला असे वाटते की समोरच्याने माझे वाईट केले़ परंतु तसे नसते ंू३्रङ्मल्ल ंल्ल ि१ींू३्रङ्मल्ल नावाचा एक प्रकार आहे़ क्रिया आणि प्रतिक्रिया हे होणारच़ हा निसर्गनियम आहे. उदा. आपण भिंतीवर जर मुद्दाम हाताने एक गुद्दा मारला तर तितक्याच वेगात तो हात मागे येतो़ यालाच क्रिया-प्रतिक्रिया म्हणतात. आरशात आपण हसून बघितले तर तुमचे प्रतिबिंब हसत तुमच्याकडे प्रतिसाद देईल़ पण तुम्ही जर क्रोधाने आरशाकडे बघितले तर ते प्रतिबिंब सुद्धा तशीच प्रतिक्रिया देईल.’
बाबा गद्रे यांचे एक पद आहे
‘झाला मानव या संसारी, आपण आपला वैरी ।धृ ।।
गाढ अविद्या मदिरा पिऊनी, शिरी मद चढला भारी ।
तेणे बरळतो मी नर नारी ।। आपण आपला....
जेवी भ्रमे शुक बद्धची मानी, बैसोनि नलिके उपरी ।
तैसा झाला हा वपुधारी ।। आपण आपला.....
मनुष्य आपणच आपला वैरी असतो़ अविद्या रुपी मदिरा पिऊन हा मनुष्य मूढ बनला आहे आणि हे खरे आहे़ कारण अज्ञान हे अतिशय वाईट असते़ या अज्ञानाचे दोन परिणाम असतात़ पहिला हे अज्ञान, आहे, त्या वास्तूचे ज्ञान होऊ देत नाही व नाही त्या वास्तूचे ज्ञान करून देते़ यालाच अन्यथा ज्ञान/विपरीत ज्ञान म्हणतात. उदा. जेव्हा आपण झोपतो तेव्हा झोप ही जागृतीवर अज्ञानाचे आवरण टाकते व नसलेले स्वप्न दाखवते़ यालाच अन्यथा ज्ञान म्हणतात. अज्ञान असून त्यात डोक्यात मद शिरतो़ तन मद, धन मद, राज मद, विद्या मद असे वेगवेगळे प्रकार आहेत. जेव्हा मनुष्याच्या ठिकाणी अज्ञान व मद शिरतो, तेव्हा तो स्वत:चा स्वत:च वैरी होतो. त्यासाठी कवीने उदाहरण दिले ज्याप्रमाणे पोपट जंगलात फिरत असताना त्याला पकडण्यासाठी विहिरीवर एक फिरती नलिका लावलेली असते व त्या नळीवर तो पोपट बसतो व ती नळी फिरते आणि त्याचे डोके आपोआप खाली होते व त्याला भ्रमाने असे वाटते की, त्याला त्या नळीला बांधून टाकले आहे व तो त्या नळीलाच घट्ट धरून ठेवतो व आपोआप बंधनात सापडतो. श्रीमद भगवद गीतेत अध्याय ६ मध्ये म्हटले आहे-
उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानमवसादये।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मन: ॥५।।
बन्धुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जित:।
अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्व ॥६।।
या दोन श्लोकामध्ये हाच आशय सांगितला आहे़ (तो मुळातून बघावा) याच श्लोकावर ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत देतात, कोषकीटक जसा स्वत:च कोष तयार करतो आणि स्वत:ला त्यात अडकवून ठेवतो व त्या कोषाला दारही ठेवीत नाही़ शेवटी त्यातच तो नष्ट होतो. एक माणूस आडवाटेने चालला होता व त्याच्या त्याच वाटेमध्ये एक सोन्याचा हंडा होता़ पण ह्याला असे वाटले की आंधळा मनुष्य कसा चालत असतो बरे? आपणच तसे चालून बघू आणि तो आंधळ्या माणसासारखा डोळे झाकून चालू लागला़ विशेष म्हणजे त्या हंड्याला याचा पाय लागला़ पण त्याने डोळे उघडले नाही.
जैसी शुकाचेनि अंगभारे। नलिका भोविन्नली एरी मोहरे।
तेणे उडावे परी न पुरे। मनशंका ।।७६।।
वायाची मान पिळी । आटुवे हिये आवळी ।
टिटाँतु नळी । धरुनी ठाके ।।७७।।
म्हणे मी बांधलों फुडा । ऐसिया भावनेचा खोडा ।
कि मोकळिया पायाचा चवडा । गोवी अधिके ।।७८।।
भ्रमाने जसे त्या पोपटाला वाटते की आपल्याला या नळीवर बांधून टाकले तसेच मनुष्य प्रपंचात बांधून घेतो़ त्याला वाटते मी नसलो तर यांचे कसे होईल? माझ्याशिवाय कोणाचे तरी अडते असे वाटत असते. शरीर आणि शरिरसंबंधी मी आणि माझे असे वाटत असते़ प्रपंच माणसाला बांधीत नसतो़ त्याविषयीची आसक्ती त्याला बद्ध करीत असते. म्हणून सर्व संतांनी प्रपंच सोडायला सांगितले नाही़ फक्त त्याची आसक्ती सोडायला सांगितली आहे. पाण्यात होडी असली तरी चालेल़ पण होडीत पाणी नसावे़ तसे प्रपंचात डोके असले तरी चालेल़ पण डोक्यात प्रपंच नसावा. आमचे वेगळे आहे, कोठेही गेलो तरी डोक्यातील विषय जात नाहीत व ते विषय त्रास देतात़ डोके भ्रमिष्ट होते आणि मग मानसोपचार तज्ञाकडे जावे लागते. या एवढ्या त्रासाला कोण कारणीभूत आहे? तर दुसरे तिसरे कोणी नसून आपण स्वत:च असतो़ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज म्हणतात,
‘कासया सत्य मानिला संसार। का हे केले चार माझे माझे ।।
उदा. मृगजळाला सत्यत्व दिले आणि हरीण त्याला पाणी समजून धावत सुटले़ शेवटी पाणी तर मिळाले नाही़ उलट धावल्यामुळे रक्त ओकून मरावे लागले़ या दु:खाला कोण कारण आहे़ तर दुसरे तिसरे कोणी नसून आपण स्वत:च आहोत. एवढे जरी माणसाला कळले तरी हे दु:ख कमी होण्यास मदतच होईल.

भागवताचार्य अशोकानंद महाराज कर्डिले
गुरुकुल भागवाश्रम, चिचोंडी (पा), ता. नगर
मोबाईल ९४२२२२०६०३

Web Title: We are your enemies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.