मनामध्ये दुर्बल विचार येणे म्हणजेच मन भरकटणे होय
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 01:49 PM2020-03-09T13:49:16+5:302020-03-09T13:49:34+5:30
मन शिथिल बनते म्हणजेच मन भरकटले जाते. जेव्हा मन उत्कृष्ट विचार करू लागते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात उत्साहवर्धक भावना निर्माण होतात.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
मनामध्ये दुर्बल विचार येणे म्हणजेच मन भरकटणे होय. मनामध्ये प्रबळता, उत्साह यांचा प्रवेश होणे म्हणजेच मनाचे येणे होय. मनाचे येणे आणि जाणे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. मनामध्ये वाईट विचार आले, मनामध्ये हित भावना निर्माण झाली की मन मोहित होते. मन शिथिल बनते म्हणजेच मन भरकटले जाते. जेव्हा मन उत्कृष्ट विचार करू लागते तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात उत्साहवर्धक भावना निर्माण होतात.
ज्यावेळी अर्जुनाचे मन त्याच्यासोबत होते, त्यावेळी त्या मनाची साथ त्याला होती. तो युद्धाला तयार झाला होता. रणांगणावर शूरवीरपणाने युद्धास सज्ज झाला होता. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून विजयाचे स्वप्न पाहू लागला; पण जेव्हा अर्जुनाची मनाने साथ सोडली तेव्हा तो कर्तृत्वहीन झाला. तो युद्ध करायला नकार देऊ लागला. त्याचे तोंड सुकले, गांडीव धनुष्य हातून निसटले. तो स्थिर नव्हता. मनाने साथ सोडली तशी अर्जुनाची अवस्था बिकट झाली. जेव्हा मन साथ सोडते त्यावेळेस कर्तृत्व, क्षमता, आत्मबल या सर्वांचा कोप होतो; पण मनाची साथ असली की साधना, आत्मबल, क्षमता, धैर्य यांच्यात प्राप्ती होते. आपलं चांगलं व्हावं, चांगल्या गोष्टी मिळाव्यात यासाठी मनाच्या प्रसन्नतेची फार गरज आहे.
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)