मानव जातीचे कल्याण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 02:18 AM2019-01-02T02:18:59+5:302019-01-02T02:19:15+5:30
मला यशस्वी जीवन जगायचे आहे, मला शांती हवी आहे आणि मला एक शांततामय जग निर्माण करण्यास मदत करावीशी वाटते. माझ्यासाठी मी केवळ एक चांगली व्यक्ती बनणे, पुरेसे आहे का?
- जग्गी वासुदेव
प्रश्न: मला यशस्वी जीवन जगायचे आहे, मला शांती हवी आहे आणि मला एक शांततामय जग निर्माण करण्यास मदत करावीशी वाटते. माझ्यासाठी मी केवळ एक चांगली व्यक्ती बनणे, पुरेसे आहे का?
सद्गुरू : तुम्ही केवळ एक चांगली व्यक्ती असणे, पुरेसे नाही. तुम्हाला या जगात राहायचे असेल, तर तुम्ही सक्षम असणेसुद्धा गरजेचे आहे. सर्वप्रथम तुम्ही चांगली व्यक्ती आहात, असे तुम्हाला कशामुळे वाटते? तुमच्या अवती-भोवती असणारी दहा माणसे काही ना काही कारणास्तव चांगली नाहीत आणि त्यांच्या तुलनेत तुम्ही अधिक चांगले आहात, असा निष्कर्ष तुम्ही काढत आहात. तुम्ही चांगले आहात याचा जितका अधिक विचार तुम्ही कराल, तितके अधिक इतर कोणीही चांगले नाही, असे तुम्हाला वाटू लागेल. जर कोणीही चांगले नसेल, तर तो नैतिकतेचा प्रश्न नसून, मूर्खपणाचा आहे. इतर कोणीही चांगले नाही, असा विचार करायची सुरुवात करणे हे मानसिक विकृतीचे पहिले लक्षण आहे.
चांगले ‘म्हणवून घेणारे’ काही लोक साधे हसूसुद्धा शकत नाहीत. का माहिती आहे का तुम्हाला? कारण त्या खूप चांगल्या व्यक्ती असतात. अनुभवामधून तुम्हाला हे स्पष्ट दिसेल की, तुमच्या जीवनाची गुणवत्ता, तुमची शैक्षणिक पात्रता, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा बँकेत किती रक्कम तुम्ही साठवली आहे, यावरून निश्चित केली जात नाही. या क्षणी, केवळ अंतर्मनातून तुम्ही किती शांत आणि आनंदी आहात, यावरून तुमच्या जीवनाची गुणवत्ता ठरते. योग आणि ध्यान या विज्ञानाच्या अशा बाजू आहेत, ज्या तुमचे अंतर्मन हाताळतात, ज्यामध्ये अंतर्मनात योग्य वातावरण निर्मिती करण्याकडे लक्ष केंद्रित केले जाते, त्यामुळेच प्राथमिक गोष्ट ही आहे की, ‘मनुष्यजातीचे कल्याण’ हे जर तुमचे कार्यक्षेत्र असेल, तर तुम्ही स्वत:कडे आधी लक्ष्य द्या, तरच तुम्ही मानवतेच्या कल्याणसाठी काहीतरी ठोस आणि स्थायी कामगिरी बजावू शकाल.