सुख म्हणजे काय असते ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 02:13 PM2018-10-25T14:13:15+5:302018-10-25T14:15:42+5:30
आपल्याला आवडणारी गोष्ट जर सुख देण्यासाठी समर्थ असेल तर ती गोष्ट सर्वांनाच सुख देऊ शकेल काय?
मनुष्याला नेहमी आनंदाची अपेक्षा असते. आपल्या जीवनात असलेले दु:ख नष्ट व्हावे आणि आपल्याला सुख प्राप्त व्हावे, असे प्रत्येकाला वाटत असते. हा आनंद मिळवण्यासाठी माणूस धन-स्त्री-मित्र-नानाविध भोग्य पदार्थ यांच्यामागे लागतो. आपल्याला जे काही सापडते त्याच्यातच आनंद आहे, असे माणसाला वाटते. परंतु, आपल्याला आवडणारी गोष्ट जर सुख देण्यासाठी समर्थ असेल तर ती गोष्ट सर्वांनाच सुख देऊ शकेल काय? याचा विचार आपण केला पाहिजे.
पदार्थजन्य सुखाच्या मागे लागताना आपण ज्या पदार्थांच्या मागे सुखाच्या अपेक्षेने लागतो तो पदार्थ पूर्वीपासूनच ज्याच्याजवळ आहे तो सुखी आहे काय? याचाही विचार केला पाहिजे आणि असा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला असे दिसून येते की, प्रत्येकजण आपल्याजवळ नसलेल्या वस्तू, सुखाचा शोध घेत असतो व तिच्यामागे धावत असतो. परंतु, ज्या पदार्थांच्या मागे जाऊन सुख मिळवण्याचा प्रयत्न केला जातो ते पदार्थ मानसिक दु:खजनक आहेत असे संतांचे म्हणणे आहे.
येर ती मासिके दु:खाची जनिती ।
नाही आदि अंती अवसानी ।।
असे श्री तुकोबाराय स्पष्टपणे सांगतात. त्यामुळे विषयांच्या उपभोगापासून, वस्तूंच्या लाभापासून सुख मिळेल ही समजूत संतांनी चुकीची ठरविली. विषयाचे सुख ही ‘बेगडाची बाहुलीच’ मानली. इंद्रियांची असमाधानी वृत्ती बाह्य विषयाकडे धाव घेत असते. परंतु, सुख हे आपल्याजवळ नसलेल्या वस्तूत नाही तर ते आपल्याजवळ असलेल्या आत्मवस्तूत आहे. ती आत्मवस्तू आपली आहे, हे अनुभवणे हाच परमार्थ होय. तोच परमार्थ श्री तुकोबाराय शिकवतात.
आपुला तो एक देव करुनि घ्यावा।
तेणेविण जीवा सुख नोई ।।
सुख हे बाहेरच्या वस्तूंचा लाभ झाल्यामुळे होणारे नसून देवाला आपले करण्यात आई, परमेश्वराच्या आश्रयातच आहे, असे संत-महात्मे वारंवार सांगतात. आपल्याला विषयात सुख वाटत असल्यामुळे आपण ते विषय पुरविणाऱ्या पदार्थांना आपलेसे करतो. परंतु, संतांच्या दृष्टीने जोपर्यंत ईश्वरावर प्रेम-भक्ती जडत नाही तोपर्यंत माणसाला सुखाचा ठेवा हस्तगत होणारच नाही. आपल्याला जे दु:ख होत असते ते मी म्हणजे देह असा देहाभिमान धारण केल्यामुळे होत असते.
देहाभिमानाचे पोटी । अनंत दु:खाचिया कोटी ।।
असे संत एकनाथ महाराजांनी म्हटलेलेच आहे. हा देहाभिमान टाकून देऊन आपण देवाला आपले करणे म्हणजे भक्तीच्या दृष्टीने आपण देवाचे भक्त आहोत असे जाणणे व ज्ञानदृष्टीने आपण देवाचे अंश आहोत, असे जाणणे व क्रमाने आपणच देव आहोत या अनुभूतीवर आरुढ होणे होय. यालाच देव आपला करुन घेणे म्हणता येईल. अशा पद्धतीने भक्तीच्या मार्गाने जाऊन देवाला आपला करुन घेणे हेच सुखाचे साधन संतांनी आपणास सांगितले. त्यावाचून सुख मिळणे अशक्य असल्यामुळेच श्री तुकोबाराय म्हणतात, तेणेविण जीवा सुख नोई ।
- प्रा.डॉ. शरदचंद्र देगलूरकर, धुंडा महाराज मठ संस्थान, देगलूर जि.नांदेड