समर्था धर्ममाचरेत्
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 03:13 AM2019-01-29T03:13:42+5:302019-01-29T03:16:05+5:30
परमेश्वर अप्रमेय आहे. अनादि अनंत आहे. धर्म त्याचं साध्य साधन सांगतो.
- बा.भो. शास्त्री
श्रीचक्रधर कधी कधी पूर्वसुरींच्या सुविचारांचा उच्चार करून उपदेश करीत असत. त्यात काही संस्कृत वाक्यं किंवा श्लोकाचं एखादं चरणही येत असे. इतरांच्या विचारांचा व आचारांचा ते नेहमीच सन्मान करीत असत. एकदा म्हाइंभटाने स्वामींना विचारलं, ‘‘कोयं धर्म समाचरति’’ धर्माचं आचरण कोण करतो? याचं उत्तर महाभारताच्या आदिपर्वात भीष्माने उच्चारलेल्या
‘‘कर्मणा येनकैनैव मृदुना दारुणनेच
उद्धरेत् दिनमात्मानं समर्थो धर्ममाचरेत्’’
या श्लोकाच्या शेवटच्या चरणातून दिलं. त्यावर परावाणीचे संस्कार झाले आहेत. म्हणून त्याला सूत्र म्हटलं. कागदाचीच नोट व्हावी, राखेचा अंगारा, पाण्याचं तीर्थ किंवा खाऊचाच प्रसाद व्हावा तसं हे सूत्र झालं. धर्म म्हणजे गट नाही. विशिष्ट समूह नाही. त्याला रंग नाही, रूप नाही. धर्म एक चांगली धारणा आहे. ‘धृ’ या संस्कृत धातूपासून तो शब्द तयार झाला. व्यापक व आत्मक धारणा म्हणजे धर्म. सर्वार्थाने पोषक असा आचार, विचार, उच्चार, आहार, विहार स्वत:ला व समाजाला जे विकसित करतं, पुष्ट करतं, त्यालाच धर्म म्हणतात. ‘‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’’ साने गुरुजींनी प्रार्थनेतून खरा धर्म सांगितला आहे. याउलट धारणारहित शोषण करणाऱ्या ज्या चित्तवृत्त्या आहेत तो अधर्म आहे. कबिराने ‘‘दया धरमका मूल है’’ या वाक्यात धर्माचा आत्माच सांगितला आहे. परमेश्वर अप्रमेय आहे. अनादि अनंत आहे. धर्म त्याचं साध्य साधन सांगतो. संत ज्ञानेश्वर म्हणतात, ‘‘तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलीया क्षमा करिजोजी यया अपराधासी’’ धर्म मंदिरात मावत नाही. त्याला देश, प्रांत, जात नसते.