अध्यात्माचा खरा अर्थ ठाऊक आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 03:10 PM2018-10-06T15:10:27+5:302018-10-06T15:28:30+5:30
आत्म्याला शुद्धता देणे, त्याची शुद्धता अनुभवणे, त्याच्या सभोवतीची परिस्थिती स्वच्छ पवित्र व पुनीत करणे म्हणजे अध्यात्मशास्त्र चोखाळणे होय.
आत्म्याला शुद्धता देणे, त्याची शुद्धता अनुभवणे, त्याच्या सभोवतीची परिस्थिती स्वच्छ पवित्र व पुनीत करणे म्हणजे अध्यात्मशास्त्र चोखाळणे होय. असे हे दिव्य शास्त्र आहे. ही जीवन विद्या, आध्यात्मिक विद्या मनुष्याला आवश्यक आहे. या ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या जीवनात निश्चितच सुखी होऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. यावर जर विचार करायला लागलात तर खोलवर जाणे आवश्यक असल्याचा प्रतिभास व्हायला वेळ लागणार नाही.
अध्यात्म आपल्याला ईश्वराबद्दलचे ज्ञान कोणाकडे आणि कोणत्यावेळी कशा पद्धतीने वागणे, अधिक चांगल्या पद्धतीने वागणे हे काटेकोरपणे अनुभवायला सांगते. अर्थात हा सुद्धा एकप्रकारचा अभ्यास मानला जातो? त्याला शास्त्र हे नाव दिले गेले आहे. या आध्यात्मिक शास्त्राचा अभ्यास करता करता मनुष्य स्वत:च्या आत्म्याकडे केंद्रित होतो. आत्म्यामध्ये विलीन होतो. त्याच्याशी तद्रूप होतो.
आपणास आत्मिक शक्ती प्राप्त व्हावी म्हणून सर्व काही करत असतो. एक गोष्ट सर्वांनी ध्यानी ठेवायला हवी. ती म्हणजे, अनेकदा आपण असे कर्म करतो जेथे आपली शक्ती नाहक वाया जाते. अशा कर्मामध्ये आपण कधीही सहभागी होऊ नये. आत्म्याची ताकद कमी होईल अशा कर्मकांडामध्ये आपण पडताच कामा नये. यालाच अध्यात्मशास्त्र म्हणतात. अनुभावाअंती अध्यात्मशास्त्र काही वेगळेच आहे, असे वाटायला लागते. याला कारण म्हणजे आपल्या जीवनात जे प्रसंग येतात, त्याकडे आपण कधीच अभ्यासू वृत्तीने बघितलेले नसते. अध्यात्म म्हणजे देव. या देवाची पूजा करणे, देव देव करणे, जप-तप करणे, देवळात जाऊन देवांच्या पाया पडणे, दान करणे, अशा एका भ्रामक कल्पनेमध्ये आपण अध्यात्माचा अर्थ डोक्यात बिंबवून घेतलेला आहे. तो चुकीचा आहे.
अध्यात्माच्या क्षेत्रात जेव्हा आपण प्रवेश करतो, त्या वेळी आपणास असे वाटायला लागते की, आपण काही गैर करीत नाही. चांगलेच करतो. आध्यात्मिक पार्श्वभूमीवर आपण सर्वसामान्यपणे आपल्या जीवनाचा पट म्हणजे पडदा वेगळ्या पद्धतीने वापरतो. आपल्या संसारातही एक पडदा असतो, परमार्थाचाही असतो. हे सगळे एवढ्याचसाठी की, देवळात गेल्यावर चांगले वागणे हे योग्यच; पण घरी आल्यानंतर वाईट वागणे; मात्र योग्य नव्हे. हे का घडते? कारण, आपण आपल्या मनात खोट्या पद्धतीने तो पडदा ठेवल्याने तो चुकीच्या पद्धतीने वापरतो. प्रसंगाचा परिपूर्ण अभ्यास नसल्याने, अभ्यासू वृती न ठेवल्याने आणि आध्यात्मिक शास्त्राचा खरा अर्थ जीवनात न लावता आल्यामुळे साहजिकच आपल्या हातून लहान-मोठ्या चुका घडतात. याचा अर्थ म्हणजे देवाचे शास्त्र आम्हास कळत नाही, ईश्वराचा आशीर्वाद आम्हास लाभत नाही.
आपण जीवनाला कंटाळू नये. ईश्वराचे आशीर्वाद सहज प्राप्त होणे शक्य नाही. आपल्या जीवनात चांगला बदल तेव्हाच घडून येईल, जेव्हा आपण श्रीगुरूंनी दिलेली उपासना चालू ठेवाल, ती व्यर्थ जाणार नाही. परमेश्वराचे कार्य आम्ही करतो आहोत तर आपली पवित्रता त्यात अडकलेली असते. परमेश्वराचे कार्य करताना पवित्रता यासाठी पाहिजे की, ती पवित्रता आपल्या आत्म्याला चांगल्या गोष्टींच्या जवळ जाण्याची संधी देते. म्हणून परमेश्वराला आवश्यक असलेली ती स्वच्छता महत्त्वाची आहे.
- संकलन : किशोर स नाईक, डोंगरी