‘अहं ब्रह्मास्मि’ भावना आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 08:54 AM2019-02-25T08:54:22+5:302019-02-25T08:59:10+5:30
ज्यांना जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यरुपी समुद्रात आपली बुद्धी स्थिर करून घ्यायची असेल त्यांनी वैराग्य धारण केले पाहिजे. अहं ब्रह्मास्मि मीच ब्रह्म आहे ही जाणीव करून घ्यायची असेल तर मनरुपी गंगेत स्नान केले पाहिजे.
ज्यांना जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यरुपी समुद्रात आपली बुद्धी स्थिर करून घ्यायची असेल त्यांनी वैराग्य धारण केले पाहिजे. अहं ब्रह्मास्मि मीच ब्रह्म आहे ही जाणीव करून घ्यायची असेल तर मनरुपी गंगेत स्नान केले पाहिजे. माझ्यातला ‘मी’च ब्रह्म होऊ शकतो. यासाठी मनाची स्थिती ब्रह्मरूप व्हावी लागते. संपूर्ण विश्व परब्रह्माचे स्वरूप आहे हा अनुभव घेतला पाहिजे. स्वप्रकाशाने सर्वांना व्यापणे ही त्याची अनुभूती असते. कारण आत्मानुभवरूपी पंखाने चिदाकाशात हवा संचार करणारा समर्थ का होऊ नये. त्या चिदाकाशात जितके आपण उंच जाऊ तितका आपणाला सुखाने संचार करायला हवा तसा विस्तार होऊ शकतो. सर्वांना माझे ज्ञान नाही कारण मी योगमायेने आच्छादित झालो आहे. म्हणूनच हे जग जन्मरहित व नाशरहित आहे असे लोक स्वत:ला समजू शकत नाहीत.
सहज विचार करून पाहिला तर ज्यामध्ये मी नाही असा एकही पदार्थ, वस्तू आहे का? मीच एक सगळ्या ठिकाणी व्यापून आहे हा विश्वास मनात ठेवणे म्हणजे त्या अमर्याद स्वरूपाला माप का घालावे, त्या निराकार स्वरूपाला साकार का समजावे, कारण मी स्वत: सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरिता का साधने करावीत. ह्या सर्व विचारांचा गोंधळ मनात असतो. मन श्रद्धेने युक्त होऊन एखाद्या देवतेची आराधना करते आणि मग त्या देवतेपासून मी इच्छित फळ घेतो. ही त्या मनाची खात्री असते. म्हणून ते मन आपले कार्य सिद्ध होईपर्यंत त्याची आराधना सुरू ठेवते. त्यावेळेस देवतेप्रति त्याची श्रद्धा, विश्वास कायम असतो. ही अल्पबुद्धी मनुष्य करू शकतो. तो देवतांची भक्ती करून आपले इच्छित प्राप्त करतो. अशी त्याच्या मनाची धारणा होते. थोड्या वेळासाठी हे बाजूला राहुू दे, मग वाटेल का ते का दैवत असेना, परंतु जो त्या देवतेला भजतो तो त्या देवत्वास प्राप्त होतो. म्हणजे शरीराने, मनाने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या मार्गात आहेत तो देह पडल्यावर मीच होतो. ही भावना असणे हीच ‘अहं ब्रह्मास्मि’ भावना आहे का? असे विचार आपल्या मनात कायम चालू असतात. सर्वात महत्त्वाची असते ती मनोधारणा.
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)