चाकातली चाकं
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 10:41 PM2020-01-14T22:41:05+5:302020-01-14T22:43:03+5:30
प्रज्ञाविकास मंडळातर्फे एक ‘चारित्र्याची जडणघडण’ या विषयावर दोन दिवसांचं शिबिर होतं.
- रमेश सप्रे
अजय-विजय नि संजय-मंजुनाथ या चैतन्यप्रसाद वसाहतीतील मित्रांच्या जोडगोळ्या होत्या. तसेच चौघेही एकमेकांचे मित्रच होते; पण त्यांच्यातही अज्जी-विज्जू आणि संजू-मंजू अशा खास जोडय़ा होत्या. त्याला कारण होतं त्यांचे स्वभाव नि दृष्टिकोन. हेच पाहा ना..
प्रज्ञाविकास मंडळातर्फे एक ‘चारित्र्याची जडणघडण’ या विषयावर दोन दिवसांचं शिबिर होतं. स्थळ जरा लांब होतं; पण मार्गदर्शनासाठी येणा-या व्यक्ती त्या-त्या क्षेत्रतील अनुभवी होत्या. संजू-मंजूनी शिबिराला जायचं निश्चित केलं. अज्जू-विज्जूंनाही विचारावं म्हणून ते त्यांना भेटले. त्यावेळी झालेला संवाद असा-
संजू-मंजू : प्रज्ञाविकास मंडळाच्या शिबिराची माहिती आहे ना?
अज्जू-विज्जू : आहे ना? पण इतक्या लांब कोण जाणार?
संजू-मंजू : काकांच्या गाडीतून जाऊ या.
अज्जू-विज्जू : ते ठीकाय. पण पहिलं सत्र आहे पहाटे पाच वाजता. म्हणजे लवकर उठावं लागणार आणि सुट्टीच्या दिवशी तरी नीट झोपायला नको का?
संजू-मंजू : मग तुम्ही सकाळच्या सहाच्या सत्राला या. आप्पांबरोबर.
अज्जू-विज्जू : अरे, त्या वेळी आमची गुलाबी झोप चालू असते. मस्त स्वप्न पडतात.
संजू-मंजू : असं आहे? मग त्यानंतरच्या सात वाजता सुरू होणा-या ‘प्रभात चिंतन’ सत्राला या.
अज्जू-विज्जू : त्यासाठी सुद्धा सहा वाजता उठून तयारी करायला नको?
संजू-मंजू : आठ वाजताच्या वक्तृत्वाच्या तंत्र-मंत्रविषयीच्या सत्राला तरी याल?
अज्जू-विज्जू : याùर, त्यावेळी आम्ही उठलेले असू.
संजू-मंजू : हरकत नाही. ‘कथाकथन कौशल्यां’च्या सत्राला तरी याच नऊ वाजता.
अज्जू-विज्जू : तेव्हा आम्ही मस्त चहा पीत, पेपर वाचत, मोबइलवरचे मेसेजेस फॉरवर्ड करत असतो.
संजू-मंजू : अरे, अकरा वाजताच्या सत्राला तरी याल का? ‘अभ्यासाचं रहस्य’ विषय आहे.
अज्जू-विज्जू : त्यावेळी आम्ही आमच्या गाडय़ा धूत असतो.
हा संवाद असाच चालू राहतो. अज्जू-विज्जूंना बाजारातून खास मासे आणायचे असतात. भरपेट चमचमीत नि झणझणीत जेवायचं असतं. दुपारी सुस्त झोपायचं असतं. संध्याकाळी पिक्चर -नाटक-भटकणं असे कार्यक्रम ठरलेले असतात. रात्री बाहेर जेवून, मजा करून उशिरा घरी परतायचं. हा त्यांचा वर्षानुवर्षाचा ठरीव कार्यक्रम. हे सारं ऐकल्यावर संजू-मंजूनी त्यांचा नाद सोडून दिला. नि आपण या शिबिराचा अधिकाधिक लाभ कसा घ्यायचा याचा विचार, नियोजन करू लागले.
किती फरक आहे नाही या दोन प्रकारच्या जीवनशैलीत!
एका जीवनशैलीत बदल करण्याचा प्रयास नाही तर दुस-या जीवनशैलीत परिवर्तनाचा ध्यास आहे. अजय-विजय यांनी आपल्या सुट्टीच्या दिवसांचीही एक घट्ट चाकोरी (रूटीन) तयार केलीय. उशिरा उठणं, गाडय़ा धुणं, चमचमीत खाणं, संध्याकाळी भटकणं नंतर बाहेर जेवून उशिरा घरी परतणं, साहजिकच नंतरच्या कामाच्या दिवसाची सुरवात सुजलेले डोळे, दुखणारे पाय, अॅसिडिटी झालेली पोटं अशी आळसात नि निष्क्रिय वृत्तीतच होणार.
कामाच्या, व्यवसायाच्या दिवसांची एक ठरावीक चाकोरी असते. ती असायलाच हवी; पण सुट्टीच्या दिवशी ही चाकोरी मोडून दुसरी चाकोरी बनवायची, दुर्दैवानं ही आपली चाकोरी विकासाऐवजी विनाशाकडे नेणारी असते.होतं काय की कामाचं एक वेळापत्रक, वर्कशीट (कार्यसूची) आपल्याला दिली जाते. ती आपल्यावर लादलेली असते. विद्यार्थ्यांचंच पाहा ना. कुणास पहिली तासिका (पिरियड) गणित, विज्ञान अशा रूक्ष विषयांचा आवडेल? चित्रकला, संगीत, खेळ (शारीरिक शिक्षण) अशा विषयांनी दिवस (टाईमटेबल) सुरू व्हावा असंच सर्वाना वाटतं.
चाकोरी बनते चाकांची, चक्रांची. ज्या चाकांना पर्यायच नाही त्यांना स्वीकारावंच लागतं. कामाच्या दिवसाची चक्रं ही चक्रम बनवणारी असतात. म्हणूनच आठवडय़ातून एक दोन दिवस सुट्टी दिलेली असते. त्या दिवशी मनसोक्त वागण्याऐवजी स्वत:च चाकं निर्माण करायची नि त्यात पिचून-पिळून जायचं यात कोणता शहाणपणा आहे? आपल्यावर लादलेली चाकातली चाकं (व्हिल्स विदिन व्हिल्स) अशा दुर्दैवी जिण्यातून आपल्याला स्वत:शिवाय कोण सावरू शकणार? कोण उभारू शकणार अशा चक्रांकित जीवनातून?
विचारवंत अनुभवातून सांगतात सुटी हा पवित्र दिवस असतो. (होली डे, नॉट जस्ट हॉलिडे!) अशा दिवशी आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठीच नव्हे तर आत्मविकासासाठी अमृतसंधी असते; पण आपणच करंटे! म्हणतात ना, दैव देतं पण कर्म नेतं!
अशा चाकातल्या चाकांनी जीवनाचा चक्काचूर होण्यापासून स्वत:ला वाचवू या. आनंदाच्या सुदर्शन चक्राला हस्तगत करूया. जीवन बिघडण्याऐवजी घडवू या. चक्रबंधात नव्हे तर मुक्तछंदात!