हा ‘एक’ कुठून आला?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 03:10 AM2020-09-23T03:10:44+5:302020-09-23T03:10:51+5:30
शुक्रवार ते रविवार माझ्या घरात ध्यानाचे शिबिर व्हायचे, तेव्हा संध्याकाळी सान सा निम भाषण देत असत.
- धनंजय जोशी
माझ्या झेन गुरूंचे एक आवडते वाक्य होते, ‘टेन थाउजंड थिंग्स बिकम वन, व्हॉट डज द वन बिकम?’.. दहा हजार गोष्टी एकामध्ये विलीन होतात, मग एक कशामध्ये विलीन होतो? पहिल्यांदा या दहा हजार गोष्टी कोणत्या ते ओळखायला पाहिजे. ते ओळखल्यानंतर ‘एक’ कोण ते समजले पाहिजे. सान सा निम मला म्हणायचे, ‘दहा हजार वर्षे तरी साधना करायला पाहिजे!’
मी मनात म्हणायचो, ‘हे तर फार लवकर काम झाले!’
शुक्रवार ते रविवार माझ्या घरात ध्यानाचे शिबिर व्हायचे, तेव्हा संध्याकाळी सान सा निम भाषण देत असत. मला ते त्यांच्याबरोबर बसायला सांगत.
पहिली पाच-सहा मिनिटे मी बोलायचे आणि नंतर ते बोलणार, अशी पद्धत होती. त्यांच्याजवळ बसून शिकणे हे माझे मोठे भाग्यच! एकदा ते भाषण देताना
म्हणाले, ‘साधनेचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे ‘मला पाहिजे - साधना’ या साधनेमध्ये आपण फक्तस्वत:चा
विचार करतो. मला शांती पाहिजे, मला साक्षात्कार
पाहिजे, मला निर्वाण पाहिजे.... सगळे ‘मला
पाहिजे’ म्हणून ती ‘मला पाहिजे-साधना’. दुसरी
साधना म्हणजे ‘परोपकारी- साधना’. ही साधना ‘माझ्या’साठी नसतेच मुळी. मी साधना करायची,
पण ती फक्तदुसऱ्यासाठी. मी जेवतो कशासाठी? मी
जेवतो तुमच्यासाठी. मला जरी साक्षात्कार झाला, तरी मी तो अर्पण करतो तुम्हाला. ध्यान साधना
संपल्यानंतर उठायच्या आधी त्या साधनेचे फळ
संबंध जगाला वाहून द्यायचे. म्हणून ती ‘परोपकारी-साधना’. त्या साधनेमध्ये सर्व जग एक होऊन जाते. दहा हजार ते एक!’
एकदा एकाने हात वर केला, ‘मला एक प्रश्न आहे’
सान सा निम म्हणाले, ‘प्लीज आस्क!’
‘तुम्ही म्हणता सर्व एक झाले असेल तर मग कोण कुणासाठी साधना करतो?’
सान सा निम हसून म्हणाले, ‘हा ‘एक’ कुठून आला ते कळले म्हणजे समजेल!’