मनुष्य पाप तरी का करतो..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 12:33 PM2020-01-29T12:33:06+5:302020-01-29T12:35:30+5:30
विहित कर्माचे आचरण न करणे, निषिद्ध कर्माचे आचरण करणे व विषयभोगात आसक्त असणे म्हणजे पाप..!
- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)
नाम चिंतनाने जन्म जन्मांतरीचे पाप नाहिसे होते असे तुकोबा म्हणाले, पापाचे पर्वत असोत वा कोटी ब्रह्म हत्या असोत नामाग्नीच्या सहाय्याने त्यांचे भस्म होते. संतश्रेष्ठ नामदेव महाराज म्हणतात -
नामदेव म्हणे नामाग्निच्या पोटी ।
नाना पाप कोटी दग्ध होती ॥
नामोच्चारणाने पापनाश होतो याबद्दल सर्व संतांचे एकमत आहे. याबद्दल कुणालाही शंका नाही पण प्रश्न असा आहे की, मी करतो हे कर्म पाप आहे, हे कळून देखील जीवात्मा हे पाप का करतो..? या प्रश्नाचे उत्तर देतांना आपण प्रथम पाप म्हणजे काय..? याचा विचार करु.. शास्त्रकार म्हणतात -
अकुर्वन्विहितं कर्म निन्दितं च समाचरन् ।
प्रसक्तश्चेन्द्रि यार्थेषु प्रायश्चित्तीयते नरः ॥
विहित कर्माचे आचरण न करणे, निषिद्ध कर्माचे आचरण करणे व विषयभोगात आसक्त असणे म्हणजे पाप..!
अर्जुनाने भगवंताला विचारले, देवा..! स्वतःची इच्छा नसतांना मनुष्य पाप करतोच का..? भगवान म्हणाले, अर्जुना..!
काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः ।
महाशनो महापाप्मा विध्येनमिह वैरिणाम ॥
रजोगुणापासून उत्पन्न झालेला काम व क्रोध हेच पापाला प्रवृत्त करतात. खरं तर काम आणि क्रोध हेच महापापी आहेत तेच माणसाचे खरे वैरी आहेत मग माणसाच्या मनांत काम आणि क्रोध तरी का उत्पन्न होतात..? असा प्रश्न पडतो..
भगवान त्याचे पण उत्तर देतात -
ध्यायतो विषयान्पुंसः संगस्तेषूपजायते ।
संगासंजायते कामःकामात्क्रोधोभि जायते ॥
विषयाच्या अखंड चिंतनामुळे काम निर्माण होतो. कामप्राप्ती झाली नाही तर क्रोध निर्माण होतो व काम पूर्ण झाला तर लोभ निर्माण होतो याच क्रमाने सर्व विकार निर्माण होतात व जीवाचा अधःपात होतो. शेवटी काय तर विषयवासना हेच सर्व पापांचे मूळ कारण ठरते.
आता विषय वासना तरी का निर्माण होते..? तर याचे उत्तर असे की, देहाला सुख पाहिजे म्हणून मनुष्य विषयांचे ध्यान करतो. मी देह आहे या भ्रामक समजुतीमुळे देहालाच सर्वस्व समजून तो सुखाची इच्छा करतो. शेवटी काय तर देहात्मबुद्धी हेच खरे पापाचे कारण आहे. तुकाराम महाराज म्हणतात -
बळे देह मी म्हणता । कोटी ब्रह्म हत्या पाप ॥
हे मानवा तू पंचमहाभूतांचा देह नसून तू सद् चिद् आनंद स्वरूप ब्रह्म आहेस. अविद्येमुळे आत्म्याच्या ठिकाणी तू अहं ची उपाधी लावून घेतलीस व पापाचरणाला प्रवृत्त झालास. तू देह नाहीस तर नित्य, शुध्द, बुद्ध, मुक्त, निर्विकल्प असा आत्मा आहेस तेव्हा विषय चिंतनाने पापकर्म करून देहाला जन्म मरणाच्या दुःख सागरात लोटु नकोस..!
( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा संपर्क क्रमांक ९४२१३४४९६० )