सत्या परता नाही धर्म...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 06:46 PM2019-03-25T18:46:36+5:302019-03-25T18:46:53+5:30
सत्य, दया, तप, आणि पवित्रता हे धर्माचे चार प्रमुख अंग आहेत. यात सत्य हे सर्व श्रेष्ठ आहे.
- भरतबुवा रामदासी
धर्माचे प्रमुख चार प्रकार आहेत. सत्य, तप, पवित्रता आणि दया. या चारही नैतिक मूल्यांनी मानवी जीवन समृद्ध बनत. ज्ञानेश्र्वरीमध्ये २६ गुणांनी युक्त असलेल्या संपत्तीला ‘दैवी संपत्ती असे म्हणतात. आपल्याला संपत्ती म्हटले की एकच विचार मनात येतो व तो म्हणजे सोने, चांदी, व पैसा हीच संपत्ती. ...पण या ठिकाणी ज्ञानेश्र्वर महाराज फक्त संपत्ती असा शब्द न वापरता ‘दैवीसंपत्ती’ असा शब्द वापरतात. दैवी संपत्ती म्हणजे ज्ञानस्वरूप संपत्ती किंवा ज्ञान? प्राप्त करून देणारी संपत्ती होय. आज आपण सत्य या नैतिक मूल्यांचे निरूपण करणार आहोत. महाभारतकार धर्माची व्याख्या करतांना म्हणतात, नास्तिसत्यात्परो धर्म: ! म्हणजे सत्याहून श्रेष्ठ धर्म नाही. सत्यं वद ! धर्मंचर, ही धर्माची आज्ञा आहे. परमेश्वर तर सत्य भाषणानेच प्रसन्न होतो. ईश्वराला सत्य सर्वाधिक प्रिय आहे. सत्य भाषणाने जन्मात कधीही अपयश प्राप्त होत नाही.
उपनिषदकार म्हणतात, सत्यमेव जयते नानृतं सत्येन पन्था विततो देवयान:! आपल्या भारतीय संस्कृतीत सत्यासाठी प्राणार्पण करणारे थोर युग पुरूष होऊन गेले. राजा हरिश्चंद्राने तर स्वप्नात दिलेले दान सत्यात उतरविले. संत तुलसीदास वर्णन करतात, रघुकल रित सदा चली आई / प्राण जाई पर बचन न जाई. !! आज समाज जीवनात पदोपदी असत्य व्यवहार केला जात आहे. कामिनी आणि कांचनाच्या मोह मायेत फसल्यामुळे आज बहुतांशी समाज जीवन धर्म तत्वापासून पदभ्रष्ट झाले आहे. आजच्या प्रगतीच्या काळात लाचलुचपत, सत्ता, भेद, स्वार्थ, आणि क्रुरता या आसुरी संपत्तीची वृद्धी होत आहे. आता प्रश्न असा पडतो की, सत्य म्हणजे तरी काय. ..?
महाभारतकार व्यास महर्षी म्हणतात; प्राणीमात्रांचे अत्यंतिक कल्याण करते ते सत्य. म्हणजेच प्राणी मात्रांचे अकल्याण करणारे सत्य नाही. सत्याची व्याप्ती मोठी आहे. सत्य म्हणजे केवळ खरे बोलणे हा स्थूल अर्थ झाला. सत्य म्हणजे ऋत. सत्य म्हणजे ऋजुता. सत्य म्हणजे संपूर्ण मानवता. मानवतेकडून देवाकडे जाण्याचा सत्य हाच एकमेव मार्ग आहे. इंद्रियाचा आणि वाणीचा समन्वय साधून जी अनुभूती प्रकटते, त्यालाच सत्य म्हणावे. सत्य म्हणजे मनातून निर्माण झालेल्या निर्मळ भावनांचा उत्कट अविष्कार.
संत तुकोबा म्हणतात, सत्या परता नाही धर्म / सत्य तेचि परब्रह्म !! मानवी जीवनाचे सर्व व्यवहार शब्दांच्याच माध्यमातून होत असतात. एकमेकांचे विचार एकमेकास कळण्यास शब्दांशिवाय दुसरे साधन नाही. असे असताना असत्य भाषणाने जीवन व्यवहार केला तर, तो अनर्थाला कारण ठरेल. म्हणून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात; सत्य कर्म आचर रे /बापा सत्य कर्म आचर रे !! सत्य कर्म आचरे होईल हित / वाढेल दु:ख असत्याचे !! मोरोपंत वर्णन करतात : सत्य सदा बोलावे सांगे गुरू आणि आपुला बाप / असत्य भाषण करणे सज्जन म्हणतात हे महापाप !! सत्य हाच परमात्मा आहे. सत्य आणि परमात्मा वेगळे नाहीतच. विठ्ठलाचे वर्णन करतांना तुकोबा म्हणाले; सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला / का गा दावियेला जगदाभास !! सत्याच्याच आश्रयाने माणूस परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. सत्य, दया, तप, आणि पवित्रता हे धर्माचे चार प्रमुख अंग आहेत. यात सत्य हे सर्व श्रेष्ठ आहे.
महाभारतात सत्य देवाची कथा आली आहे.एक सत्यदेव नावाचा राजा होता. हा नित्याप्रमाणे प्रात:काळी झोपेतून जागा झाला. त्याने आपल्या घरातून एक अप्रतिम लावण्यवती सुंदर स्त्री राज वाड्याबाहेर जातांना बघितली. राज्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या स्त्रीला विचारले, तू कोण आहेस? ती म्हणाली माझे नाव लक्ष्मी आहे. मी आता तुझ्या घरातून निघून जात आहे. राजाने तिला परवानगी दिली. थोड्या वेळाने एक सुंदर पुरूष बाहेर पडतांना राजाला दिसला. राजाने त्यालाही विचारले; महाराज आपण कोण? तो म्हणाला, मी दान आहे. लक्ष्मीच निघून गेली तर मी कसा राहू? मी पण हे घर सोडून जात आहे. राजाने त्यालाही परवानगी दिली. थोड्या वेळाने तिसरा पुरूष घरातून बाहेर पडतांना राजाने बघितला. तो सदाचार होता, राजाने त्याला पण अडवले नाही. सगळेच जातात तर जा...
सर्वात शेवटी सर्वांग सुंदर युवक घरातून बाहेर पडतांना राजाला दिसला. राजाने त्याला विचारले, महाराज आपण कोण आहात? तो म्हणाला मी सत्य आहे. ज्या घरातून लक्ष्मी, दान, सदाचार, यश निघून गेले. तिथे मी तरी कसा राहणार? मी पण त्यांच्या बरोबर जाणार. ...त्या वेळी सत्यदेव राजा म्हणाला, तुला हे घर सोडून जाता येणार नाही. मी तुला आयुष्यात कधी सोडले नाही तर मग तू मला का सोडतोस. मी तुला या घरातून कधीच जाऊ देणार नाही. लक्ष्मी, दान, सदाचार, यश यांना मी तुझ्या विश्वासावरच तर सोडले. तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. सत्य घर सोडून न गेल्यामुळे गेलेली लक्ष्मी, दान, सदाचार परत आले. म्हणून सत्य हेच सर्व श्रेष्ठ धन आहे. जिथे सत्य आहे, तिथेच लक्ष्मी, दान सदाचार व यश यांना राहावेच लागते. सत्य हे एक हजार अश्वमेध यज्ञापेक्षाही श्रेष्ठ आहे. महाभारतकार म्हणतात, अश्वमेध सहस्त्राणि सत्यमेव विशिष्यते. ..! आजच्या विकार विवशतेच्या काळात सत्य या जीवन मूल्याची नितांत गरज आहे.
( लेखक राष्ट्रीय कीर्तनकार आहेत,संपर्क - 942134496 )