स्नेह, सौहार्दाची मूर्तिमंत प्रतिमा स्री
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 08:34 AM2019-08-12T08:34:32+5:302019-08-12T08:39:45+5:30
आई बनून मुलांवर संस्कार करते ती स्त्री. या जगाची प्रथम ओळख करून देते तीही स्री.
स्री ही मनुष्यजन्माची जननी आहे. स्रीमुळेच मानव निर्माण झाला. मनुष्याचा जन्म आणि जीवन स्रीशिवाय नाही. मानव जातीची सुधारणा आणि कल्याण स्रीवर अवलंबून आहे. स्रीचे परिवारात प्रथम स्थान असते. आई बनून मुलांवर संस्कार करते ती स्त्री. या जगाची प्रथम ओळख करून देते तीही स्री. मुलांचे विचार, भावना आणि व्यवहार आईच्या संस्कारातून येतात. सात्त्विक बीजाचे जीवनात रोपण स्रीच करू शकते. स्री ही एक सुमंगल विचारांची धारा आहे. शालीनता, सुशीलता, सुस्थिरता आणि शोभनीयता स्रीच्या ठिकाणी असते किंवा असायला हवी. त्यातूनच तीचे सौंदर्य खुलते. स्री ही मनुष्याची उषा आहे. एका स्रीमुळेच रामायण घडते अन् महाभारत. स्रीच्या ठिकाणी संयम, सदाचार, महत्त्वाकांक्षा, चेतना, विवेक, जागृती, बोध व सत्त्व आदी गुण असतात. त्या गुणांचा योग्य वापर केल्यास मनुष्यजन्माचे कल्याणकारी आदर्श स्री ठरते.
स्री धर्मपरायतेने वागली तर तिच्यापोटी जन्माला येणारी संतान संयमी, धर्मात्मा व कर्तव्यपरायण निघेल. कर्तव्यपरायण संततीमुळेच समाज व राष्ट्राचे कल्याण होऊ शकते. स्त्रीशक्तीचा सन्मान करणे, रक्षण करणे हीच राष्ट्र कल्याणाची बीजे असतात. स्री राष्ट्र व समाजाची आधारशीला आहे. राष्ट्रांच्या सांस्कृतिक व सामाज जीवनात स्रीचा सिंहाचा वाटा आहे. मुलांवर उत्तम संस्कार उत्तम आईच करू शकते. मानवी जीवनाचे प्रतिबिंब स्रीच असते. मनुष्याचा बौद्धिक विकास, मानसिक विकास यात स्रीची भूमिका महत्त्वाची ठरते. स्री एक शक्ती आहे. तिचा योग्य सन्मान झाला तर देशाची मान उंचावेल. स्री शक्ती आनंदी असली की घरात स्वर्ग निर्माण होतो. जर घरातली स्री दु:खी व कष्टी असेल तर तेथे नरक निर्माण होतो. ज्या ठिकाणी स्रीला सन्मानतेची वागणूक दिली जाते ते घर, तो देश सुखी होतो. जीवनात कोणत्याही यशस्वी पुरुषामागे एका स्रीशक्तीचा हात असतो. स्री स्नेह व सौहार्दाची मूर्तिमंत प्रतिमा आहे. स्रीमन समजून घ्या. स्रीचे मन श्रद्धावान असते. धार्मिकता व आध्यात्मिकता स्त्रीनेच जपली आहे. स्त्रीची श्रद्धा-माया ओली आहे. स्त्रीचे हृदय मृदृता, मानवीयता, सौम्यतेने भरलेले आहे. स्रीमनाचा एका कवीने विचार मांडला आहे,
स्री का मन सुकोमल
प्रसाद है वह पावन।
जिसका प्रभाव
फुटी किस्मत को भी जगा दे।।
डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज
(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)