शब्द हे मनाचे आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 05:38 PM2018-12-26T17:38:07+5:302018-12-26T17:40:37+5:30

व्यक्तीचे सुप्त मन सुखावते ते फक्त प्रेमाच्या दोन शब्दांनी.

Word is the basis of the mind | शब्द हे मनाचे आधार

शब्द हे मनाचे आधार

Next

शब्द म्हणजे अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. व्यक्तीचे संवाद साधण्याचे साधन म्हणजे शब्द.  शब्द व्यक्तीला कधी सुखावतात तर कधी दुखावतात. शब्दांनीच मन जुळते तर कधी आयुष्यभरासाठी दुरावते. शब्दचं मनाला भुरळ घालतात आणि गुंतवतात प्रेमाच्या नात्यांमध्ये. शब्द आणि मन यांचे जवळचे नाते आहे. दोन शब्द प्रेमाचे ऐकले की; मन प्रसन्न आणि उत्साहित होते. हेच दोन शब्द मन दुखावणारे असतील तर आयुष्यभर मन खट्टू राहते. इतके मन आणि शब्दांचे अतुट नाते आहे. अक्षरांपासून शब्द तयार होतात. शब्दांचे वाक्य आणि वाक्यांचा परिश्छेद. तसे बघितल्यास दोन व्यक्तिंमध्ये चांगल्या शब्दांचा संवाद असल्यास दोघेही एकमेकांच्या मनाची काळजी आयुष्यभर घेतात. आपल्याकडे लग्न जमवतांना पत्रिका बघतात. मुलाचे आणि मुलीचे छत्तीस गुण जुळणे हे भाग्याचे लक्षण समजले जाते. असे मानले जाते की छत्तीस गुण जुळणारे जोडपे एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात, एकमेकांच्या शब्दांचा आदर ठेवतात ते पाळतात. पण हे छत्तीस गुण जुळणे म्हणजे नेमके काय ? 

आपल्या मराठी भाषेमध्ये १२ स्वर आणि ३४ व्यंजने आहेत. ‘ क्ष ’ आणि ‘ ज्ञ ’ मिळून ही वर्णमाला ४८ वर्णांची होते. यातील ३४ व्यंजने आणि ‘ क्ष ’ आणि ‘ ज्ञ ’ मिळून छत्तीस अक्षरे होतात. या अक्षरांपासून शब्द तयार होतो. शब्दांपासून तयार झालेली ही वाक्य ज्या प्रमाणात जुळतात तितके गुण जुळले असे तर नाही ना ? हे ३६ गुण म्हणजे ३६ अक्षरांपासून तयार होणारे शब्द आणि वाक्य, एकमेकांचे किती मन सांभाळतील असेच ना !  शब्द आधार असतात व्यक्तीच्या मनाचे. ज्या व्यक्तीच्या बोलण्याने आपल्या मनाला आधार असल्या सारखे वाटते त्या व्यक्ती सोबत तासंतास बोलत रहावेसे वाटते. मन हे फार चंचल असते. त्याला आवर घालणे फक्त शब्दांनाच जमते.
व्यक्ती स्वत:च्या मनाशी रोज काहीना काही बोलत असते. मनाशी होणारा हा स्वतःचा संवाद शब्दांनीच होत असतो. व्यक्तीचे सुप्त मन सुखावते ते फक्त प्रेमाच्या दोन शब्दांनी. या सुप्त मनाला होणारा हा शाब्दिक आधार व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसतो. हा आनंद कुठल्या ही भौतिक वस्तूमुळे होत नाही. तो होतो प्रेमाच्या दोन शब्दांनी. म्हणून असे म्हणतात की व्यक्तीने आपले शब्द जपून वापरावे. कुणाचे मन दुखावेल असे काही बोलू नये. परंतू आजकाल व्यक्ती खूप व्यस्त झाला आहे. त्याला कुणाशी बोलायला वेळ नाही. तो विविध सोशल साईट वर अनोळखी व्यक्तींशी लिखीत स्वरुपात खूप बोलतोय.  

परंतू त्याला हे लक्षात येत नाहीये की, तो ज्या कुणाच्या सहजीवनात जगतोय. त्यांना त्याच्या दोन प्रेमळ शब्दांची किती गरज आहे ? त्याच्या या दोन शब्दांनी जन्मदात्यांचे, पतीचे- पत्नीचे, मुलांचे काही दिवसांनी आयुष्य वाढेल. ज्या साठी तो धाव-धावतोय त्या सर्वांना पैसा, प्रतिष्ठा, मान, सन्मान हे काही लागत नसून. त्यांना हवे आहेत मनाला सुखावणारे ओले दोन प्रेमळ शब्द. आजच्या वातावरणात हेच दोन प्रेमळ शब्द,  प्रेमळ संवाद कुठे तरी हरवलाय. मना-मनात निर्माण झाली आहे एक दरी, ती ही शब्दांमुळेच. दुखावली गेली आहेत नाती, मन ते ही शब्दांमुळेच. शब्द हे असे हत्यार आहे. जे असा घाव करतात की मनावर होणारी ओली चांगली-वाईट जखम कायम स्मरणात ठेवतात. मन जिंकणे सर्वांनाच जमत नाही. कारण मनावर राज्य करतील असे शब्द सर्वांनाच सुचत नाही. बाल कवी, बहिणाबाई, मंगेश पाडगावकर, मर्ढेकर या सारख्या कवींच्या कविता आज ही मना मनात अधिराज्य गाजवताय ते शब्दांमुळेच. म्हणून आज प्रत्येकाने लक्षात घ्यावे की, शब्द हे मनाचे आधार आहे. 

- सचिन काळे, जालना ( ९८८१८४९६६६) 

Web Title: Word is the basis of the mind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.