रक्तात भिजलेले शब्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2020 05:47 AM2020-04-08T05:47:17+5:302020-04-08T05:47:23+5:30
‘अशी पाऊले, या धरतीवर तिमिराचे पट भेदूनी उमटत गेली म्हणून पृथ्वी सूर्यकुळातून निखळून पडली नाही’ ख्रिस्ताच्या या बलिदानावर कविवर्य ...
‘अशी पाऊले, या धरतीवर
तिमिराचे पट भेदूनी उमटत गेली
म्हणून पृथ्वी सूर्यकुळातून निखळून पडली नाही’
ख्रिस्ताच्या या बलिदानावर कविवर्य कुसुमाग्रज यांनी केलेले भाष्य अगदी मार्मिक आहे. २००० वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताचे येरुसलेममधील कालवारी टेकडीवर महाबलिदान झाले! क्रुसावर अनंत यातनामध्ये असतानाही प्रभू ख्र्रिस्ताने मारेकऱ्यांना आणि जगातील साºया मानवांना उद्देशून म्हटले होते, ‘हे पित्या त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांनाच कळत नाही.’ इतिहासाच्या ताम्रपटावर आणि माणसाच्या काळजावर कोरले गेलेले हे रक्तरंजित शब्द अमर झाले आहेत. त्या शब्दांनी अनेकांना क्षमाशीलतेची प्रेरणा दिली आहे.
उदाहरण द्यायचे तर हिटलरच्या छळछावणीत फादर मॅक्सी विल्यम कोलगे शिक्षा भोगत होते. या छळछावणीतील एका प्रापंचिकाला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. पत्नी व मुलाबाळांची आता पुनर्भेट होणार नाही या जाणिवेने तो ढसढसा रडू लागला. फादर मॅक्सी विल्यम यांना ही गोष्ट कळताच ते तुरुंगाधिकाºयाला म्हणाले, ‘या गृहस्थाऐवजी मला मृत्यूदंड द्या. कारण मी एक नि:संग फादर आहे.’ फादरांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि ते हसतहसत प्रभू येशूचे स्तवन करीत सुळावर गेले. मध्य प्रदेशात गोरगरिबांसाठी कार्य करणाºया केरळातील राणी मरिया नावाच्या सिस्टरची सावकारांनी भाडोत्री मारेकऱ्यांतर्फे हत्या केली. मारेकºयाला तुरुंगवास झाला. नंतर सिस्टरच्या बहिणीने रक्षाबंधनाला तुरुंगात जाऊन त्या मारेकºयाला राखी बांधून भाऊ मानले. तिच्या आईनेही त्याला मुलगा मानले. हे ऐकून तो मारेकरी ढसाढसा रडला. तुरुंगाधिकाºयांच्या परवानगीने तो सिस्टराच्या घरी गेला व त्याने सर्व नातेवाइकांची क्षमा मागितली तसेच यापुढे सद्वर्तनी जीवन जगण्याचे त्याने वचन दिले. ईश्वर अशी प्रेरणा आपल्या सगळ्यांना देवो, हाच गुडफ्रायडेचा संदेश!
फा. फ्रान्सिस दिब्रिटो