जग ही बंदिशाळा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 04:27 AM2020-04-22T04:27:58+5:302020-04-22T04:28:10+5:30
आज घराच्या सीमाही ओलांडणे धोकादायक ठरत आहे. माणूस माणसापासून अंतर ठेवत आहे, कारण ते त्याच्या आरोग्यासाठी हितावह आणि आवश्यक झाले आहे.
- फादर दिब्रिटो
कोलंबसने सातासमुद्राच्या सीमा ओलांडून जागतिक संपर्काचा विक्रम नोंदवला. चिनी व्यापारी भारतात आले, भारतीय व्यापारी ग्रीसपर्यंत पोहोचले. प्रसारमाध्यमामुळे माणूस एकमेकांच्या जवळ आलेला आहे, आणि तो खऱ्या अर्थाने बोलू लागला आहे ‘दुनिया मेरे मुठ्ठी मे’. माणसाला मैत्रीचा हात देणारा माणूसच आज बंधनात आहे. आज संपर्क हेच संसर्गासाठी निमित्त बनत आहे. आज घराच्या सीमाही ओलांडणे धोकादायक ठरत आहे. माणूस माणसापासून अंतर ठेवत आहे, कारण ते त्याच्या आरोग्यासाठी हितावह आणि आवश्यक झाले आहे. आपल्या प्रगतीच्या घोडदौडीमुळे माणूस स्वत:ला अजिंक्य समजत होता. तो मंगळावर जायची तयारी करू लागला आहे, समुद्राचा तळ त्याने गाठला आहे आणि मी सर्वश्रेष्ठ आहे, मला कोणी आव्हान देऊ शकत नाही अशा मग्रुरीत तो होता. अशा तथाकथित अजिंक्य माणसावर घरात कैद होण्याची वेळ आलीे.
कुठूनतरी वाºयाची झुळूक यावी आणि झाडांची शेकडो पाने गळून पडावीत तशी कोरोनामुळे माणसे मरत आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानाच्या पत्नीला कोरोनाने घेरले आहे, त्यांच्या डोळ्यातील अश्रूंची ती क्लिप पाहून माझेही डोळे पाणावले. ही महामारी ती गरीब किंवा श्रीमंत, सुशिक्षित किंवा अशिक्षित, ग्रामीण किंवा शहरी असा भेद करीत नाही. बायबलमध्ये स्तोत्रकार म्हणतो, ‘मी जेव्हा भरल्या आकाशाकडे पाहतो तेव्हा मी चिंतामग्न होतो आणि स्वत:ला प्रश्न विचारतो, काय हा माणूस?, ज्याला देवाच्या मनामध्ये स्थान आहे, सर्व पशुपक्ष्यांमध्ये तो श्रेष्ठ आहे, या माणसाची काय ही परिस्थिती झाली आहे?’ मी एक व्यंगचित्र पाहिले त्यात माणूस पिंजºयात बंदिस्त आहे आणि पशुपक्षी त्याला बाहेरून जणूकाही हिणवून सांगतायेत, ‘तू स्वत:ला अजिंक्य समजतो आहेस, तू आम्हाला कावेबाजपणे फासे मांडून पकडतो आणि पिंजऱ्यात कोंबतोस, आता तरी तुला स्वातंत्र्याची किंमत कळली का?’