सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २५, हे विश्व आपले घर आहे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 07:00 AM2017-08-31T07:00:00+5:302017-08-31T07:00:00+5:30
हे विश्व आपले घर आहे व आपण सर्व देवाची लेकरे आहोत. आपण सर्व बंधू आहोत ही संकल्पना जर जगात राबवली गेली तर जगात सुखच सुख असेल. कुठेही दु:ख निर्माणच होणार नाही.पण आज जगात नेमके उलटे चाललेले आहे
- सदगुरू श्री वामनराव पै
हे विश्व आपले घर आहे व आपण सर्व देवाची लेकरे आहोत. आपण सर्व बंधू आहोत ही संकल्पना जर जगात राबवली गेली तर जगात सुखच सुख असेल. कुठेही दु:ख निर्माणच होणार नाही.पण आज जगात नेमके उलटे चाललेले आहे. कुणी कुणाला विचारत नाही, कुणाचा पायपोस कुणात नाही, एकमेकांचा द्वेष करतात, एकमेकांचा तिरस्कार करतात, एकमेकांशी भांडतात, युध्द लढाया करतात व हे कोण करतो तर ज्या माणसाकडे बुध्दी आहे तोच हे करत असतो. इतर प्राण्यांमध्ये तुम्हाला या गोष्टी कधीच दिसणार नाहीत. इतर प्राण्यांमध्ये युध्द लढाया झालेल्या आपण कधी ऐकल्या नाहीत. दोन कुत्रे एकमेकांशी झगडतील पण एक बाजूला एका कुत्र्याची फौज व दुस-या बाजूला दुस-या कुत्र्याची फौज असे कधी होत नाही. माणसे मात्र आपला ग्रुप करतात आपली फौज तयार करतात व एकमेकांविरूध्द लढतात, संहार करतात. दुस-या महायुध्दापर्यंत किती लोक मारले गेले, किती मुले बेवारस झाली, किती बायका विधवा झाल्या आणि आता जर पुन्हा युध्द झाले तर सर्वच संपेल. आता जर युध्द झाले तर मी जिंकलो असे सांगायला सुध्दा कुणी उरणार नाही. याला कारण माणसाची बुध्दी माणसाच्या बुध्दीने जितकी प्रगती साधलेली आहे तितकीच तीने स्वत:च्या विनाशाची सुध्दा तयारी करून ठेवलेली आहे. आपल्या पुराणात एक सुंदर कथा आहे ती म्हणजे भस्मासुराची. भस्मासुराला भगवान शंकराने वर दिला. आपल्याला माहित आहे भगवान शंकर हा भोळा शंकर आहे. त्याच्याकडे जे मागावे त्याला तो तथास्तु म्हणतो.भस्मासुराने भगवान शंकराची तपश्चर्या केली. भगवान शंकराने त्याला प्रसन्न होऊन वर मागायला सांगितले. त्यावर याने काय मागितले तर मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म झाले पाहिजे. म्हणजे बघा लोक काय मागतात. माणसाची बुध्दी ही अशी आहे. लोकांचे कल्याण होणारे काहितरी मागावे, लोकांचे भले होण्यासाठी काहीतरी मागावे ही बुध्दीच कोणाकडे नाही व तरीही स्वत:ला माणूस बुध्दीमान समजत असतो. असो या वरामुळे भस्मासुराने ज्याच्या त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्यांचे भस्म करायला सुरवात केली. यामुळे त्याला जे जे नको होते त्यांचे भस्म झाले. शेवटी त्याने विचार केला की आपण शंकराच्या डोक्यावर हात ठेवूया म्हणजे आपल्याला पार्वती मिळेल. त्यामुळे शंकर धावू लागले व हा त्यांच्यामागे धावतो आहे. शेवटी विष्णुला शंकराच्या मदतीला धावावे लागले. विष्णूने मोहिनीचे रूप धारण केले व भस्मासुराला असे नाचवले, असे नाचवले की त्याने नाचताना त्याच्या स्वत:च्याच डोक्यावर हात येईल अशी मुद्रा केली. त्यामुळे भस्मासुराने स्वत:च्याच डोक्यावर हात ठेवला व त्यामुळे त्याचे भस्म झाले. ही कथा जी आहे ती मोठी मार्मिक आहे. भस्मासुराने जसे केले ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन त्याचे भस्म करीन तसे आज माणूस ज्याच्या डोक्यावर हात ठेवतो त्याच्या डोक्यावरून हात फिरवतो. म्हणजे दुस-याचे वाईट चिंतित आहे.