ईश्वराची उपासना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 01:56 AM2018-11-24T01:56:46+5:302018-11-24T01:57:03+5:30
भगवंतच या संपूर्ण दृश्य विश्वाचा निर्माता, त्राता आणि संहारकर्ता आहे, हे ज्ञानमार्गानेच कळते. चराचरात एक भगवंतच व्यापून आहे हे सत्य जेव्हा साधकाला जाणवते तेव्हाच त्याला ‘वासुदेव: सर्वामिति’ या भगवंत वचनाचा अनुभव येईल.
- वामन देशपांडे
भगवंतच या संपूर्ण दृश्य विश्वाचा निर्माता, त्राता आणि संहारकर्ता आहे, हे ज्ञानमार्गानेच कळते. चराचरात एक भगवंतच व्यापून आहे हे सत्य जेव्हा साधकाला जाणवते तेव्हाच त्याला ‘वासुदेव: सर्वामिति’ या भगवंत वचनाचा अनुभव येईल. त्या दिव्य क्षणी त्याचे हे जगणे केवळ भगवंताच्या नामाने अक्षरश: सदैव झंकारत राहील आणि त्याचे अवघे अस्तित्व चंदनगंधी होईल...
साधक भगताने आपल्या साधनेची धृवदिशा, भगवंत अस्तित्व हेच केवळ सत्य आहे, त्या विचाराशी स्थिर करून नामसाधनेत आपला प्रत्येक क्षण जर गुंफला तरच त्याला असा साक्षात्कार होईल की सर्वत्र जसे एक आकाशच पसरलेले आहे तसा सर्वत्र एक भगवंतच आहे. निर्गुण निराकार अवकाशव्यापी परमेश्वराची उपासना श्रेष्ठ मानणारे साधक भक्त विवेकाच्या साहाय्याने परमेश्वरी सान्निध्याचा अनुभव अष्टौप्रहर भोगत राहतील आणि सगुण साकार भगवंताची उपासना करणारे भक्तीहृदयी श्रेष्ठ भक्तीने भारलेल्या आपल्या सर्वांगाने परमेश्वरी सान्निध्याचा संवादी अनुभव भोगताना त्यांचे अवघे आनंदमय झालेले अस्तित्व म्हणजे आनंदाचा अक्षय तृप्तीचा डोह होईल. सत्यच सांगायचे झाले तर, ज्ञानमार्गी साधक भक्त, परमेश्वरी अस्तित्व आहे असे मानतो तर भक्तीमार्गी परमभक्त केवळ मानतच नाही तर तो परमेश्वरी अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेत राहतो. दोन्ही प्रकारच्या भक्तांच्या हृदयवीणा भगवंत नामातच सदैव झंकारत असतात. भक्ती दोघांचीही अतुटच असते. तरीही भगवंत आपल्या परमप्रिय भक्ताला आवर्जून एक रहस्य त्यासंदर्भात सांगतात की,
ज्ञानी त्वामैव मे मतम।।
पार्था, जो ज्ञानमार्गाने माझे अस्तित्व प्रत्यक्ष आनंदाने अनुभवतो, तो खरा भक्त असतो. कारण तो माझे स्वरूपच असतो. हे माझे मत तू प्रथम ध्यानात घे... कामनाविरहित, आसक्तीविरहित उपासना भगवंतांना अधिक प्रिय असते. भाग्याने लाभलेल्या या मानवी योगीचा आपण सदुपयोगच तर केला पाहिजे ना... विषयभोग हा मानवी योनीचा मूळत: उद्देशच नाही. तो विषयभोग इतर योनींसाठी आहे, हे साधक भक्ताने कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सर्वत्र एक परमेश्वरच गच्च भरून आहे, याचे भान फक्त मानवी योनीपाशी आहे. कारण माणसाला आपल्या बुद्धीचा वापर आत्मकल्याणासाठी करता येतो. इतर योनी परमेश्वरी अस्तित्वासंबंधी अनभिज्ञ आहे.