निराकाराची उपासना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 03:07 AM2019-12-07T03:07:01+5:302019-12-07T03:07:16+5:30
हे तत्त्व फक्त विवेक संपन्न योगी पुरुषांच्या ज्ञानकक्षेत सहजपणे प्रवेश करते.
- वामन देशपांडे
भक्तीयोग श्रेष्ठ आहे, हे त्रिवार सत्य आहे. किंबहुना ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन योगांचे फल म्हणजे भक्तीयोग, असे भगवंतांचे निश्चित मत आहे. स्वत: भगवंतांनी हे आपले मत मांडताना भक्तश्रेष्ठ अर्जुनाला एक महत्त्वाचा विचार गीतेच्या पाचव्या अध्यायाच्या शेवटी मांडला होता की,
भांत्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम्।
सुहृद सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति।।
पार्था, परमेश्वर सत्य आहे आणि त्रैलोक्यावर फक्त त्याचीच सत्ता आहे हे सत्य प्रत्येक साधकाला ज्ञात असणे अत्यावश्यक आहे. साधकाच्या हे लक्षात यायला हवे की, एका परमेश्वरी सत्तेशिवाय या त्रिभुवनात दुसऱ्या कोणाचीही सत्ता चालत नाही. पार्था तू फक्त एकच सत्य ग्रहण कर की, मी परमेश्वर आहे. सर्व यज्ञांचा, सर्व प्रकारच्या तपांचा, मीच भोक्ता आहे. हे तू एकदा भक्तीपातळीवर ज्ञानमार्गाने जाणून घेतलेस आणि निष्काम वृत्तीने प्रत्येक विहित कर्म, फलाशा विरहित पूर्ण करून फलासहित तू मलाच अर्पण केलेस, तर तुला परमशांती सहजगत्या प्राप्त होईल. पार्था, मी तुझा प्राणप्रिय सखा, मित्र आणि गुरू आहे. सर्वांचा हितकर्ता आहे. हे जाणणे हीच तर खरी भक्ती आहे रे, पार्था.. निर्गुण निराकार परमेश्वराच्या उपासनेत काठीण्य अधिक आहे. कारण एकच. परमेश्वर हा मानवी इंद्रियांचा विषय होतच नाही. थोडक्यात सांगायचे झाले तर, परमेश्वरी अनुभव इंद्रियगोचर होत नाही. निर्गुण निराकाराची उपासना करणाºया साधक भक्तांपाशी प्रखर वैराग्य आणि जबरदस्त विवेकबुद्धी असणे अत्यंत आवश्यक असते. जर मन आसक्त स्थितीत सदैव वावरत असेल तर निर्गुण उपासना खूपच कठीण जाते. हे तत्त्व फक्त विवेक संपन्न योगी पुरुषांच्या ज्ञानकक्षेत सहजपणे प्रवेश करते.