राग- स्वनिर्मित खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 06:12 AM2019-01-16T06:12:12+5:302019-01-16T06:12:18+5:30

राग येणे हे तसे कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा व्यक्तीविरोधात नाही.

Wrath-made game | राग- स्वनिर्मित खेळ

राग- स्वनिर्मित खेळ

Next

सद्गुरु जग्गी वासुदेव
राग येणे हे तसे कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा व्यक्तीविरोधात नाही. राग येणे, संतापणे, तो व्यक्त होणे म्हणजे तुम्ही रागावलेले आहात. मग तुम्ही एखाद्या दगडावर रागावलेले आहात किंवा ईश्वर किंवा गुरू किंवा आणखी कोणावर रागावलेले असाल. राग हा केवळ राग आहे. तुम्हाला वगळता त्याचा इतर कोणाशी किंवा कशाशी काहीच संबंध नसतो. तुम्हाला सतत राग येत राहतो, याचे कारण म्हणजे तुमचा असलेला असा विश्वास की, तुमच्या रागाचे कारण दुसरे कोणीतरी आहे. जर तुम्ही हे जाणलेत की, त्याचा संबंध फक्त आणि फक्त तुमच्या स्वत:शीच आहे, तर मग तुमचा राग फार काळ टिकणार नाही. ते समजून घेणे, राग येण्याच्या कारणाबाबत, त्याचे मूळ शोधण्याबाबत काम करणे सर्वात महत्वाचे आहे.  


कोणत्याही गोष्टीचा राग येण्याचे मूळ कारण म्हणजे, एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा प्रसंगाबद्दल तुमच्या तीव्र आवडी आणि नावडी. एखादी विशिष्ट विचारसरणी किंवा भावनेशी खोलवर ओळख जोडल्याने राग येतो. तो राग हाच जगण्याचा, विचार करण्याचा आणि भावना प्रकट करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, अशी तुमची ठाम धारणा बनते. जो कोणी त्या अपेक्षांच्या चौकटीत बसत नाही, तुम्ही त्यांच्यावर रागावता. तुमची त्या विषयाबाबतची तीव्र भावना तुम्ही त्या व्यक्तीसमोर व्यक्त करता. तुमच्या भावनेला मोकळी वाट करून देता. कधी कधी राग थेटपणे व्यक्त होतो. त्यातून तुम्ही तुमच्या भावनांचे प्रकटीकरण करता. अनेकदा त्या भावना जर आपण व्यक्त केल्या नाहीत, तरी त्या आपल्या कृतीतून इतरांना जाणवत राहतात. त्या प्रसंगाबाबतची, घटनेबाबतची तुमची भावना कधी तीव्र रूपाने, कधी नाराजीतून तर कधी धुसफुशीतून तुम्ही व्यक्त करत राहता. त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर, नातेसंबंधांवर, तुमच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या परस्पर संवादावर होत राहतो.


जसजशा तुमच्या आवडी-नावडी, पसंती-नापसंती तीव्र होत जातात, जसजशा तुमच्या इतर गोष्टींबरोबर जोडल्या गेलेल्या ओळखी अधिक गाढ होत जातात, तेव्हा हळूहळू अस्तित्वातील सर्वकाही तुम्ही वगळत असता. मी जर असे म्हणालो, ‘मला हे खूपच आवडते,’ तर त्याच क्षणी बाकी सारे अस्तित्वच मी वगळतो. म्हणजे फक्त आवत्या गोष्टीवरच आपले मन, लक्ष्य केंद्रित झालेले असते. तुमच्या पसंती किंवा नापसंती जितक्या तीव्र बनत जातात, तितके खोलवर तुम्ही अस्तित्वापासून विभक्त होत जाता. अनेकदा हा राग मर्यादा ओलांडतो. कारण तुम्ही कोणाला किंवा कशाला तरी तुमचाच एक भाग म्हणून सामावून घेतलेले नाही, हे त्या कृतीतून तुम्ही दाखवून देता. राग हे कर्म नाही, पण सामावून न घेण्याची वृत्ती, हे मात्र कर्म आहे. तुमच्या आयुष्याची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, हे दाखविण्यासाठी राग हा फक्त एक छोटासा संकेत आहे. त्यातून तुम्ही तुमच्या व्यक्तित्त्वाचा एक पैलू सर्वांसमोर आणता.


मुक्तीची अवघी प्रक्रियाच मुळात सामावून घेण्यात आहे, वगळण्यात नाही. विभक्त असलात की तुम्ही एका सापळ्यात अडकता, तुम्ही वेगळे पडता. सामावून घेण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही मुक्त होता. ज्या दिवशी एकूणएक गोष्ट, संपूर्ण अस्तित्व तुमच्यात सामावले जाते, त्याच क्षणी तुम्ही मुक्त होता. हे मुक्त होणे साध्य करायचे असेल तर रागावर नियंत्रण गरजेचे आहे.

Web Title: Wrath-made game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.