यंदा शुभमंगल सोहळ्यासाठी केवळ ४९ मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:46 AM2019-11-13T10:46:36+5:302019-11-13T10:48:09+5:30
यंदा मुहूर्त कमी असल्याने एकाच मुहूर्तावर अनेक लग्न कार्ये पार पडतील
सोलापूर : गतवर्षीच्या तुलनेत यंदा ३५ विवाह मुहूर्त कमी असून, कार्तिक ते आषाढ या मराठी महिन्यांत केवळ ४९ विवाह मुहूर्त असल्याचे ज्योतिष पंडित नागेश इनामदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गेल्या वर्षी ४९ तर २०१७-१८ मध्ये ५३ विवाह मुहूर्त होते.
दाते आणि रोहिकर पंचांगानुसार काढण्यात आलेल्या मुहूर्तावर विवाह सोहळे पार पाडले जातात. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दाते पंचांगानुसारच मुहूर्त निवडले जातात.
दिवाळीतील तुलसी विवाहानंतर यंदाच्या नोव्हेंबर महिन्यातील (कार्तिक/मार्गशीर्ष) २०, २३ आणि २८ या तीन तारखांना विवाह मुहूर्त असून, गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लग्नाचा एकही मुहूर्त नव्हता. डिसेंबर २०१९ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात ९ तर यंदाच्या डिसेंबर महिन्यात १, २, ३, ६, ८, ११ आणि १२ या तारखा विवाहासाठी शुभमुहूर्त आहेत. जानेवारी महिन्यातील (पौष/माघ) १८, २०, २९, ३०, ३१, फेब्रुवारीमध्ये (माघ/फाल्गुन) १, ४, १२, १३, १४, १६, २६, २७, मार्च (फाल्गुन) महिन्यात ३, ४, ८, ११, १२, १९, एप्रिल २०२० म्हणजे चैत्र/वैशाखमध्ये १५, १६, २६, २७ या तारखा दाते पंचांगानुसार विवाहासाठी शुभमुहूर्त आहेत. यंदा ज्येष्ठ महिन्यात २४ मे, ११, १४, १५, २५, २९ आणि ३० जूनला विवाहासाठी शुभमुहूर्त आहेत. गेल्या वर्षी मात्र ज्येष्ठ महिन्यात १४ मुहूर्त आले होते.
यंदा २७ गोरज मुहूर्त- नागेश इनामदार
- - सायंकाळी गोरज मुहूर्तावरही विवाह लावले जातात. यंदा २७ गोरज मुहूर्त असून, त्यासाठी २० नोव्हेंबर, १ आणि २ डिसेंबर, १८, २०, २९, ३० आणि ३१ जानेवारी, ४, १२, १३ आणि १६ फेब्रुवारी, ३, ८, ११, १२, १९ मार्च, १५ आणि १६ एप्रिल, २, ५, ६, १२, १४, १७, १८ मे तर ३० जून रोजी गोरज मुहूर्त असल्याचे ज्योतिष पंडित नागेश इनामदार यांनी सांगितले.
- वैशाखमध्येही दोन मुहूर्त कमीच
- - मराठी महिन्यातील वैशाखमध्ये यंदा २६, २७ एप्रिल रोजी तर मे महिन्यातील २, ५, ६, ८, १२, १४, १७, १८, १९ या तारखा विवाहासाठी शुभमुहूर्त आहेत. गेल्या वर्षी मे महिन्यात आलेल्या वैशाखमध्ये ७, ८, १२, १४, १५, १७, १९, २१, २३, २६, २९, ३० आणि ३१ या तारखांच्या मुहूर्तावर विवाह पार पडले होते.
यंदा मुहूर्त कमी असल्याने एकाच मुहूर्तावर अनेक लग्न कार्ये पार पडतील. अशा अवस्थेत मंगल भांडार चालकांना जलद सेवा द्यावी लागणार आहे. यंदाच्या लग्न सोहळ्यात अद्ययावत साहित्य मागवण्यात आले आहेत.
-वीरेंद्र हिंगमिरे,
मंगल भांडार चालक.