योगक्षेमं वहाम्यहम्

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 05:02 PM2019-04-04T17:02:06+5:302019-04-04T17:02:18+5:30

एक राजा आपल्या दरबारातील पंडितांकडून गीता समजावून घेत होता. त्याला गीतेतील भगवंताचा उपदेश ऐकताना खूप आनंद होत होता.

Yogeshmam Wahamyaham | योगक्षेमं वहाम्यहम्

योगक्षेमं वहाम्यहम्

googlenewsNext

- रमेश सप्रे

एक राजा आपल्या दरबारातील पंडितांकडून गीता समजावून घेत होता. त्याला गीतेतील भगवंताचा उपदेश ऐकताना खूप आनंद होत होता. नवव्या अध्यायातील बाविसाव्या श्लोकाच्या एका चरणाचा अर्थ त्याला समजला नाही. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ म्हणजे काय असं त्यानं विचारल्यामुळे पंडितजींनी निरनिराळे अर्थ सांगून पाहिले, पण त्याला ते पटले नाहीत. उलट पंडितांच्या अज्ञानाचा त्याला राग आला. तो म्हणाला, उद्या जर माझं समाधान होईल असा अर्थ तुम्ही सांगू शकला नाहीत तर तुम्हाला जन्मभर बंदिवासात ठेवलं जाईल. 

हे ऐकून पंडितजींना झोप लागली नाही. कारण त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर एकुलत्या एक असलेल्या मुलीचे तेच मातापिता दोन्ही होते. आपण जर बंदीवासात पडलो तर या दहा वर्षाच्या कोवळ्या मुलीचं कसं होणार? हा विचार त्यांना अस्वस्थ करीत होता. मुलीला मध्यरात्रीनंतर सहज जाग आली अन् बघतेय तर काय? बाबा झोपेविना तळमळत आहेत. डोळ्यातून अश्रूही वाहताहेत. तिनं विचारलं, बाबा, कसलं दु:ख होतंय तुम्हाला? यावर तिला जवळ घेत बाबांनी सर्व घटना सांगितली आणि म्हटलं, ‘माझ्यानंतर तुझ्याकडे कोण पाहणार? योगक्षेमं वहाम्यहम्’चा अर्थ बाबांना का सांगता येत नाही हे त्या हुशार मुलीच्या लक्षात आलं, ती म्हणाली बाबा, उद्या मला दरबारात न्या. मी सांगते राजाला योग्य तो अर्थ. 

दुसरे दिवशी ती चिमुरडी दरबारात आली. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’चा अर्थ तिनं बाबांकडून समजावून घेतला होता. राजा दरबारात आल्यावर ती राजाला उद्देशून म्हणाली, ‘राजा तुझं समाधान होईल असा त्या ोकाचा अर्थ मी तुला सांगते पण त्यासाठी मी सांगेन तशी कृती करावी लागेल. राजानं होकार देताच तिनं सेवकांना दोन मोठे दोर आणायला सांगितले. दरबारात समोरासमोर जे खांब होते त्यापैकी एकाला आपल्या वडिलांना बांधून घालायला सांगितले तर दुस-या समोरच्या खांबाला राजाला बांधायला सांगितलं. राजाच्या संमतीनं सेवकांनी तसं केल्यावर तिनं त्या दोघांना सांगितलं, ‘राजा तुझी सत्ता नि बाबा तुम्ही तुमचं ज्ञान वापरून एकमेकांना मुक्त करा. दोघांनीही एकदमच म्हटलं, मी स्वत: बांधलेलो असताना दुस-याला कसा सोडवू शकेन?

यावर शांतपणे ती चिमुरडी म्हणाली, हेच तर खरं उत्तर आहे. आपण बंदिवासात गेल्यावर मुलीचं म्हणजे माझं कसं होणार या चिंतेने बाबा बांधले गेले होते, तळमळत होते, काळजी घेणारा भगवंत आहे. स्वत: त्यानं हे सांगितलंय. माझं सतत स्मरण-चिंतन करा, तुमच्या प्रपंचाचा भार मी वाहीन. हे बाबांना कळलंच नाही. स्वत:ला न कळलेला विचार आपण दुस-याला कसा पटवून देणार?

तिच्या त्या स्पष्टीकरणानं राजाचं समाधान झालं. तिच्या वडिलांनाही धन्य वाटलं. सा-या उपस्थितांनी मुलीच्या चातुर्याचं कौतुक केलं. राजानं तिचा सारा भार स्वत: उचलण्याचं वचनही दिलं. आनंदाचं तत्त्व तेच आहे दुस-याला आनंदी ठेवायचं असेल तर स्वत: आनंदी नको का राहायला? दुस-याला चिंतामुक्त करायचं तर स्वत: निश्चिंत व्हायला नको का? हल्ली आपण फक्त संदेश पाठवतो हॅपी होली, हॅपी दिवाली, हॅपी ख्रिसमस पण केवळ शाब्दिक संदेश पाठवून कसं दुस-याला आनंदी बनवू शकू? संक्रांतीला आपण तिळगूळ देऊन काय म्हणतो? तिळगूळ घ्या, गोड बोला म्हणजे प्रत्येकजण दुस:याला गोड बोला असं सांगतो. स्वत: गोड बोलण्याचा विचारही तो करत नाही. या ऐवजी असं जर म्हटलं, तिळगूळ घ्या, मी गोड बोलेन, तर त्याला काहीतरी अर्थ आहे. एकाप्रकारची बांधिलकी आपण स्वत:वर लादून घेतोय. ती निभावली तर खरंच सर्वत्र मधुर वातावरण नि स्नेहल संबंध निर्माण होतील. इथं एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी, काळजीमुक्त, तणावमुक्त नि आनंदयुक्त जगण्याची पहिली जबाबदारी माझी आहे. मग माझ्या चालण्याबोलण्या-वागण्यातून इतरांना आपोआप आनंदी राहण्याची प्रेरणा मिळेल. स्वत: घालून दिलेला आदर्श शंभर व्याख्यानं प्रवचनांपेक्षा महत्त्वाचा असतो. 

‘योगक्षेमं वहाम्यहम्’ मी तुमचा योगक्षेम (उदरनिर्वाह) चालवीन असं आश्वासन देण्यापूर्वी भगवंतानं काही गोष्टी आवर्जून सांगितल्या आहेत. अनन्यभावानं परमेश्वराचं चिंतन करायचं, सर्व कर्म ही माझीच पूजा आहे अशा पूज्य भावनेनं करायची आणि सतत माझ्याशी जोडलेलं राहायचं. माझं म्हणजे भगवंताचं विस्मरण क्षणभरही होऊ द्यायचं नाही. एवढं जरी जमलं की दुस-या कशाची चिंता करण्याची आवश्यकताच नाही. भगवंतांचं स्मरण म्हणजे केवळ भगवंताचं नाम सतत घेणं असं नव्हे. तर हे सारं विश्व चालवणारी एक अदृश्य शक्ती आहे. तिचा प्रभाव माझ्या जीवनावर पडलेला आहे याचं सतत भान ठेवायचं. चिंता आणि आनंद, ताण आणि आनंद, भय आणि आनंद एकत्र असूच शकत नाहीत. हेच तर खरं आनंदाचं प्राणसूत्र आहे. 

Web Title: Yogeshmam Wahamyaham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Yogaयोग