योगक्षेमं वहाम्यहम्

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2019 05:40 AM2019-08-01T05:40:35+5:302019-08-01T05:40:37+5:30

व्यामोहावर मात करू, बंधमुक्तीची आस धरू।

Yogyakasam Vahyamham | योगक्षेमं वहाम्यहम्

योगक्षेमं वहाम्यहम्

Next

वंदन श्रीकृष्णास करू, कृष्ण आहे जगद्गुरू
व्यामोहावर मात करू, बंधमुक्तीची आस धरू।

ज्याच्यामुळे प्रकाश मिळतो, ज्ञान मिळते, ते गुरुतत्त्व! तर मग जो गुरूंचाही गुरू जगताचा गुरू, श्रीकृष्ण, त्याला वंदन करू या. त्यानेच तर आपल्याला कर्मयोग, भक्तीयोग, ज्ञानयोग सोप्या शब्दांत भगवद्गीतेत सांगितला. अर्जुनाचे निमित्त..! शिवाय त्यानेच तर आपल्याला योगक्षेमं वहाम्यहम् ही खात्रीसुद्धा दिली आहे. कृष्णा, तुला गुरू मानायचं तर ठरलं. तू मार्गही दाखवतोस. पण हे मन फारच चंचल आहे रे! त्याला एका जागी स्थिर करणंसुद्धा अवघड आहे. शिवाय तसं म्हणलं तर तुझ्यामुळेच आम्ही इतकेही अनभिज्ञ नाही. काय करावं, काय करू नये, हे आम्हाला कळतं, तरी पण आम्ही असे अविवेकाने का वागतो? जे करू नये, तिकडे आमचं मन का ओढलं जातं? अतिशय आर्तपणे

आम्ही सांगतोय, आम्हाला मार्ग दाखव.
हे हृदयस्थ परमेश्वरा, हृषीकेश माधव श्रीधरा,
संभ्रमातल्या मला, मार्ग दाखवी खरा।
प्रेरणा तुझीच ती, दिशाही तूच दावतो,
विवेक रूप घेऊनी, चालण्या शिकवतो,
का तरी मी निवडतो, पथ असा भला बुरा
संभ्रमातल्या मला, मार्ग दाखवी खरा।
जाणतो धर्म मी, काय योग्य वागणे,
ना तरी जमे मला, त्यानुसार चालणे।
जाणतो अधर्मही, त्याज्य त्यास त्यागणे
तरीही तोच खेचतो, अशक्य त्यास टाळणे।
अंतरात राहूनी, उसळवितोस जो झरा,
वागणे तसेच हे, खेळ हा तुझा खरा।
वायुपरी चंचल मन, हट्टी हे दुराग्रही,
लगाम त्यास घालणे, कठीण हे खरोखरी।
निग्रह वैराग्य दे, वश करण्यास अंतरा,
संभ्रमातल्या मला, मार्ग दाखवी खरा।

Web Title: Yogyakasam Vahyamham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.