तैसी चिंता अपार वाढविती निरंतर ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 03:48 PM2019-11-30T15:48:05+5:302019-11-30T15:51:42+5:30

विषय प्राप्त न झाला तर प्राप्तीची चिंता, प्राप्त झाला तर रक्षणाची चिंता निर्माण होते.

Your worries are constantly increasing ..! | तैसी चिंता अपार वाढविती निरंतर ..!

तैसी चिंता अपार वाढविती निरंतर ..!

googlenewsNext

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

जगात प्रत्येक मानव प्राणी हा सतत चिंताग्रस्त असतो. सुखात असो की दुःखात, चिंता ही माणसाचा पाठलाग कधीच सोडत नाही. आपण म्हणाल, चिंता म्हणजे तरी काय.? जी वस्तू आपणाजवळ नसेल त्या वस्तूची प्राप्ती झाली नाही तर, अंतरंगात जी वृत्ती निर्माण होते तिला चिंता असे म्हणतात. सज्जनहो.! चिंता ही एक मानसिक विकृती आहे. विषय प्राप्त न झाला तर प्राप्तीची चिंता, प्राप्त झाला तर रक्षणाची चिंता निर्माण होते. चिंता या विकृतीला पूर्ण विराम कधीच नाही. अमर्याद विषयोपभोगाने ती सतत वाढत जाते.

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
या चि एका आयती तयाचिया कर्म प्रवृत्ती
आणि जिणयाहि परौती वाहवी चिंता
तैसी चिंता अपार वाढविती निरंतर
जीवी सुनी असार विषयादिक

चिंतेचे साधारण दोन प्रकार आहेत.
1)सांसारिक चिंता व
2)अध्यात्मिक चिंता 

संसारातील चिंता ही ज्याचे त्यालाच निवारण करावी लागते. निवारण झाली तरी ती परत निर्माण होणारच नाही याची खात्री देता येत नाही. अध्यात्मिक चिंता मात्र संतकृपेने किंवा सद्गुरुकृपेने निवारण होते व परत चिंता शिल्लक राहातच नाही. खरं तर परमेश्वराचा निस्सीम भक्त कधी ऐहिक चिंताच करत नाही कारण विषयोपभोगाची प्राप्ती ही इच्छेवर अवलंबून नसून ती आपल्या पूर्वकर्मानुसार अवलंबून असते, याची जाणीव हरिभक्ताला असते. त्यामुळे तो विषयोपभोगाच्या संदर्भात उदासीन असतो.

तुकाराम महाराज म्हणतात -
ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान
 

हीच त्याची मनोवृत्ती असते. हरिभक्ताच्या चिंतनाचा, प्रेमाचा, विषयच भगवंत असल्यामुळे ऐहिक विषयांचे चिंतन करण्यास त्यास वेळ कुठे असतो..?  भक्ताची ही अनन्यता, निष्ठा, भाव, बघून परमेश्वर इतका संतुष्ट होतो की त्याची संसारिक जबाबदारी देखील देवालाच पार पाडावी लागते मात्र अनन्य भक्त असेल तरच हे घडणे शक्य आहे.

तुकोबा म्हणाले -

माझी सर्व चिंता आहे विठोबासी
मी त्याच्या पायाशी न विसंबे

साम्राज्यज्ञान चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

पै सर्व भावेसी उखिते जो वोपिले मज चित्ते
जैसा गर्भ गोळु उद्यमाते कोणाही नेणे

ज्याप्रमाणे आईच्या गर्भातील मूल सर्वार्थाने आईशी अनन्य असते. किंवा पतिव्रता स्त्री पतीशी अनन्य असते. सूर्याची किरणें जशी सूर्याशी अनन्य असतात. तितका भक्त जर देवाशी अनन्य असेल तर

मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बहारीचे वर्णन करतात. सर्वसामान्यपणे माणसाला अन्न, वस्त्र, निवारा याचीच सदैव चिंता असते परंतु जगाचा पालनकर्ता आपल्या जवळ असतांना तो भक्ताची उपेक्षा करील का...? 

तुकाराम महाराज म्हणतात -
पाषाणाचे पोटी बैसला दर्दुर

तया मुखी चारा कोण घाली

पक्षी अजगर न करी संचय

तयासी अनंत प्रतिपाळी
परमात्मा षड्गुणऐश्वर्य संपन्न असल्यामुळे भक्ताच्या इच्छा पूर्ण करणे त्याला अशक्य नाही त्याने सुदाम देवाला सुवर्णनगरी देऊन त्याचे दारिद्र्य दूर केले. उपमन्यूस क्षीरसागर दिला. द्रौपदीची लज्जा रक्षण केली. कबीराचे शेले विणले. ज्या ज्या वेळी भक्तावर संकटे आली त्या वेळी भक्ताला संकटातून चिंतामुक्त केल्याच्या कथा पुराणात आहेत मग आपण कशाला उगाच चिंता करत बसावे..? चिंता न करणारे प्राणी सुखात जीवन जगतात ना..? 

भगवान तुलसीदास स्वामी अतिशय बहारीचे वर्णन करतात -

तुलसी मुरदें को देत है कपडा लकडी आग
जिता रहकर सोस खरे सो नर बडे अभाग

निर्जीव प्रेताला देखील वेळेवर कपडा, लाकूड व अग्नी इत्यादि साहित्य देव देतो मग माणसाला जगण्याएवढे देणार नाही का.? फक्त अनन्य भक्त होता आले पाहिजे. एवढी अनन्य भक्ती साधली की माऊली वर्णन करतात -

ते एकवटुनि जिये क्षणी अनुसरले गा माझिये वाहणी तेव्हाचि तयाचि चिंतवणी मजचि पडली

म्हणोनि गा भक्ता नाही एकही चिंता
तयाते मी समुध्दर्ता आथी मी सदा

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्रमांक 8329878467 ) 

Web Title: Your worries are constantly increasing ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.