झेन कथा - रॉक अॅण्ड रोल, आणि...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 04:15 AM2020-10-13T04:15:39+5:302020-10-13T04:15:56+5:30
सान सा निम बरोबर राहणारे आणि वीकेण्डला साधनेसाठी येणारे साधक खूप अपसेट होत गेले.
धनंजय जोशी
सान सा निम यांचे पहिले झेन सेंटर प्रॉव्हिडन्स, ºहोड आयलंडमध्ये एका दुसऱ्या मजल्यावरच्या छोट्याशा अपार्टमेंटमध्ये होते. तिथे सान सा निम आणि तीन साधक राहायचे. वीकेण्डला ध्यान शिबिरे व्हायची. काही दिवसांनंतर पहिल्या मजल्यावरच्या अपार्टमेंटमध्ये एका रॉक अॅण्ड रोल बॅण्डचे लोक राहायला आले. त्यांची रॉक अॅण्ड रोल गाण्यांची प्रॅक्टिस चालू झाली. म्हणजे, तुम्ही कल्पना करा किती मोठा आवाज होत असेल म्हणून! दुसºया मजल्यावर ध्यान साधना आणि पहिल्या मजल्यावर रॉक अॅण्ड रोल!
सान सा निम बरोबर राहणारे आणि वीकेण्डला साधनेसाठी येणारे साधक खूप अपसेट होत गेले. शेवटी ते सान सा निमकडे गेले आणि म्हणाले, ‘सान सा निम, हा बॅण्ड इतका कर्कश आहे की आम्ही शांतपणे ध्यानाला बसूच शकत नाही. तुम्ही त्यांना काहीतरी सांगून पहा. आम्ही कशी साधना करणार?’
सान सा निम त्यांना म्हणाले, ‘डोण्ट वरी अबाउट देम, ओके? शांत वातावरणात शांती सापडली तर त्यात काय मोठे झाले? तुमची साधना अशी पाहिजे की जिथे अजिबात शांतता नाही आणि तरीही तुमच्या साधनेमुळे तुम्ही मनाची शांतता अनुभवू शकता, ती खरी शांती! कोणत्याही परिस्थितीत आणि कोणत्याही वातावरणात मन स्थिर (नॉट मुव्हिंग) राहणे ही खरी साधना ! तो रॉक अॅण्ड रोल बॅण्ड म्हणजे तुम्हाला शिकवण्यासाठी बुद्ध म्हणून उभा राहिला आहे असे समजा ! ..काय?’ - साधनेला बसताना इकडे तिकडे आवाज येऊ लागले तर मी सान सा निमची ही शिकवण मनात आणतो आणि शांत बसतो.