झेन कथा : टूथब्रश आणि ई-मेल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 03:27 AM2020-10-12T03:27:24+5:302020-10-12T03:28:02+5:30
माझ्या गुरुंना मी एक प्रश्न विचारला होता. मी म्हणालो, ‘मला एक समजत नाही. मी बघतो सगळीकडे की लोक असे जीवन जगतात
धनंजय जोशी
माझी मुलगी डेंटिस्ट आहे. तिला तिच्या क्लिनिकमध्ये नवीन नवीन गोष्टी मिळत असतात. अलीकडेच तिने मला एक इलेक्ट्रिक ब्रश आणून दिला. त्या ब्रशसाठी तुमच्या फोनवर डाऊनलोड करण्याचे एक अॅप असते, तेही तिने मला डाऊनलोड करून दिले. आता हे अॅप कशासाठी? तर तुम्ही दात घासताना फोन तोंडासमोर धरायचा म्हणजे मग ते अॅप सांगते, की तुम्ही बरोबर सगळे दात घासलेत की नाही? आणखी एक सोय म्हणजे दर दिवसाची माहिती फोनमध्ये साठवून ठेवली जाते. मी एका वीकेंडला बाहेरगावी गेलो होतो तेव्हा तो ब्रश घरी विसरून गेलो. त्यामुळे दोन-तीन दिवस वापरला गेला नाही. घरी परत आल्यावर पाहिले, तर माझ्या इनबॉक्समध्ये त्या टूथब्रशकडून एक ई-मेल आली होती : ‘तुम्ही गेले तीन दिवस दिसला नाहीत. आपली चुकामुक झाली - वी मिस्ड यू!’ - मला हसावे की रडावे ते कळेना!
नंतर विचार आला मनामध्ये! आपण टूथब्रशकडून ई-मेल आल्यावर आधी जरा घाबरूनच जातो; पण आपले मन आपल्याला अशा कितीतरी ‘ई-मेल्स’ सतत पाठवत असते, मात्र आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. आपले हव्यास, आपल्या आवडी-निवडी, आपले राग आणि लोभ ह्या सगळ्यामध्ये गुंतून आपण जीवन जगतो. मन सांगते आपल्याला की, ‘बाबा रे, हा सगळा दु:खाचा प्रकार आहे. सगळे बदलत असणारे विश्व, त्याच्यात गुंतून राहू नकोस. तुला मनाची शांती हवी तर साधनेचा हात धरून चाल!’- आपण ऐकतो का? बहुतेक नाहीच.
माझ्या गुरुंना मी एक प्रश्न विचारला होता. मी म्हणालो, ‘मला एक समजत नाही. मी बघतो सगळीकडे की लोक असे जीवन जगतात ज्यामध्ये त्यांनी थोडी जरी साधना केली तर त्यांना कितीतरी मन:शांती मिळून जाईल. मग ते का करीत नाही?’ माझे गुरु हसून म्हणाले, नॉट इनफ सफरिंग यट.. अजून त्यांनी पुरेशा दु:खाचा अनुभव घेतलेला नसतो, म्हणून!’ मला वाटले, ते ठीकच आहे; पण आपण तरी कशाला थांबावे तेवढ्यासाठी?