झेन कथा - पाण्याचा एक थेंब!
By योगेश मेहेंदळे | Published: November 13, 2017 01:21 PM2017-11-13T13:21:26+5:302017-11-13T13:27:03+5:30
गिसान नावाचे एक झेन गुरू होते. अन्य झेन गुरूंप्रमाणेच केवळ पुस्तकी ज्ञानातून अध्यात्मिक शिकवण न देता, जगण्याच्या रोजच्या अनुभवातून शिष्यांना शिकवण देण्यासाठी ते प्रसिद्ध होते.
गिसान नावाचे एक झेन गुरू होते. अन्य झेन गुरूंप्रमाणेच केवळ पुस्तकी ज्ञानातून अध्यात्मिक शिकवण न देता, जगण्याच्या रोजच्या अनुभवातून शिष्यांना शिकवण देण्यासाठी ते प्रसिद्ध होते.
एके दिवशी काय झालं? ते आंघोळीला बसणार इतक्यात त्यांच्या लक्षात आलं की पाणी जरा जास्तच गरम आहे. त्यांनी एका शिष्याला बोलावलं आणि सांगितलं की जरा थंड पाण्याची एक बादली भरून आण आणि हे गरम पाणी थोडं कोमट कर, ते फारच गरम आहे.
शिष्य गेला व त्यांनी थंड पाण्याची बादली भरून आणली. त्यानं गरम पाण्यामध्ये थंड पाणी ओतलं आणि गिसान यांना आंघोळ करता येईल इतकं ते कोमट केलं. हे काम झाल्यावर त्यांनं बादलीतलं उरलेलं थंड पाणी स्नागृहात ओतून टाकलं.
त्या क्षणी गिसान, त्या शिष्यावर अज्ञानी, मूर्ख माणसा असं म्हणते जोरात खेकसले. एकदम धक्का बसलेल्या त्या शिष्याकडे बघत ते पुढे म्हणाले, उरलेलं पाणी तू झाडांना का नाही दिलंस. पाण्याचा एक थेंबदेखील वाया घालवण्याचा अधिकार या मंदिरामध्ये तुला कोणी दिला?
असं म्हणतात, त्याक्षणी त्या शिष्याला झेनचा साक्षात्कार झाला. त्यानं आपलं नाव बदललं आणि तेकीसुई असं नवं नाव धारण केलं. तेकीसुईचा अर्थ आहे पाण्याचा थेंब!