झेन कथा - मृत्यूशय्येवर फुललं पहिलं हसू
By योगेश मेहेंदळे | Published: November 15, 2017 03:22 PM2017-11-15T15:22:45+5:302017-11-15T16:36:10+5:30
मोकुजेन नावाचे एक झेन गुरू होते. त्यांना आयुष्यात कधी कुणी हसताना बघितलं नव्हतं. त्यांचा अंतकाळ जवळ आला, त्यावेळी मात्र एक आश्चर्य घडलं आणि पृथ्वीवरील वास्तव्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमललं.
मोकुजेन नावाचे एक झेन गुरू होते. त्यांना आयुष्यात कधी कुणी हसताना बघितलं नव्हतं. त्यांचा अंतकाळ जवळ आला, त्यावेळी मात्र एक आश्चर्य घडलं आणि पृथ्वीवरील वास्तव्याच्या शेवटच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमललं.
मोकुजेन मृत्यूपंथाला लागले होते. आता आपली वेळ संपलीय हे जेव्हा त्यांना जाणवलं, तेव्हा त्यांनी त्यांच्या शिष्यांना जवळ बोलावलं. ते म्हणाले, "तुम्ही जवळपास 10 वर्षे माझ्यासोबत आहात. झेनचा तुम्हाला समजलेला खरा अर्थ मला सांगा. जो झेनचा खरा अर्थ सांगेल, सत्याच्या जवळ पोचेल तो माझी जागा घेईल, त्याला माझं वस्त्र आणि कमंडलू मिळेल."
मृत्यूच्या दारात असलेल्या मोकुजेनना सगळ्यांनी न्याहाळलं, परंतु कुणीही उत्तर द्यायला धजावलं नाही. एंको, हा मोकुजेन यांचा खूप जुना शिष्य होता. तो आपल्या गुरूच्या जवळ गेला. त्याने, मोकुजेन यांची औषधं ठेवलेलं भांडं किंचित पुढे सरकवलं. हेच त्याचं उत्तर होतं.
मोकुजेन यांच्या चेहऱ्यावर वेदना वाढलेली दिसली. त्यांनी विचारलं, तू जे काही आत्तापर्यंत शिकलास ते हेच आहे का? एंको पुन्हा पुढे गेला आणि त्यानं पुन्हा तो कप हलवत आधी जिथं होता तिथं सरकवून ठेवला.
हे बघितल्यावर, आयुष्यात प्रथमच मोकुजेन यांच्या चेहऱ्यावर अत्यंत सुंदर असं हसू फुललं. ते म्हणाले, "अरे गधड्या, तू माझ्याबरोबर 10 वर्षं राहिलास पण कधी मान वर करून माझ्याकडे बघितलं नाहीस असं प्रेमानं दटावलं. माझं वस्त्र आणि कमंडलू तू घे, त्यावर तुझा अधिकार आहे."