झेन कथा : घोडा आणि म्हैस!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2020 01:48 AM2020-10-03T01:48:28+5:302020-10-03T01:48:38+5:30
मला ही कथा खूप आवडते.
धनंजय जोशी
एक जण आपल्या घोड्यावरून खूप वेगाने जात असतो. त्याचा मित्र त्याला विचारतो, ‘अरे, तू कोठे चाललास?’ तो मित्र म्हणतो, ‘मला का विचारतोस? या घोड्याला विचार!’ आपले मन आपल्याला त्या घोड्याप्रमाणे कुठे कुठे घेऊन जात असते. खरे की नाही? आणखी एक उदाहरण म्हणजे आपण म्हशीची शेपटी घट्ट धरून ठेवायची आणि म्हणत राहायचे, ‘अगं अगं, म्हशी मला कुठे नेशी?’ आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्या हे लक्षातपण येत नाही. कारण आपण खरे पहिले तर आपण प्रत्येक क्षणाकडे नीट बघतच नाही. आपल्या मनाला ते शिकवले गेले नाही तर आपण बघणार कसे? त्याच्यासाठी साधना पाहिजे. काळजी घेऊन प्रत्येक क्षणाकडे आणि आपल्या मनाकडे बघितले पाहिजे.
एक साधी गोष्ट करून पहावी. सगळ्यांना ज्ञान शिबिराला जायची संधी मिळतेच असे नाही म्हणून सांगतो. पंधरा मिनिटे बाजूला काढून शांत बसावे आणि मनाकडे लक्ष द्यावे. मनाला सांगावे, ‘आता पुढची पंधरा मिनिटे फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष दे. दुसरे काहीही विचार येऊ देऊ नकोस.’ तुम्हाला आश्चर्य वाटेल, की इतकी साधी गोष्ट, पण तुमचे मन तुम्हाला त्या घोड्याप्रमाणे हजारो ठिकाणी घेऊन जाईल आणि एकदम लक्षात येईल, ‘अरेरे, पंधरा मिनिटे होऊन गेली केव्हाच!’ एक महत्त्वाची गोष्टपण आपल्याला कळून चुकेल. ती म्हणजे मनाला साधनेची आवड करून देणे किती आवश्यक आहे ते ! माझ्या गुरुंनी एक साधा उपाय सांगितला होता. ते म्हणाले, ‘जेव्हा जेव्हा मन नको ते विचार घरामध्ये येऊ देते, तेव्हा त्याला शांतपणे सांगावे - ‘नॉट नाऊ - आता नाही’ आणि बघा, की ते कसे सरळ मागल्या दाराने बाहेर निघून जातात !