झेन कथा: प्रत्येक श्वासात प्रेम!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 01:31 AM2020-10-15T01:31:53+5:302020-10-15T01:32:06+5:30
सान सा निम तेव्हा परतले होते. ते माझ्या आणि त्यांच्या शिष्यांच्या पत्रांना अगदी नियमित आणि लगेच उत्तर देत असत. मी त्यांना पत्र लिहून माझा अनुभव कळवला.
धनंजय जोशी
सान सा निमच्या एका शिबिरानंतर झालेली ही गोष्ट. शिबिर नेहमीप्रमाणे कठीण आणि आनंदित पण! मी गाडीतून कुठेतरी चाललो होतो. गाडीमध्ये रेडिओ चालू होता. ब्रूस स्प्रिन्गस्टीनची रेकॉर्ड सुरू झाली : एव्हरीबडीज गॉट अ हंग्री हार्ट!... एकदम आभाळ भरून यावे तसे काळीज भरून आले. डोळ्यांमधून अश्रूंची धार लागली. जसे काही जगाचे दु:ख समोर उभे राहिल्यासारखी भावना हृदयात उचंबळून आली. वाटले की एवढे दु:ख, एवढे सफरिंग का? ‘मी काय करू शकतो?’ हा मोठा प्रश्न मनात आला. गाडी बाजूला घेतली आणि अश्रू थांबेपर्यंत शांत बसलो.
सान सा निम तेव्हा परतले होते. ते माझ्या आणि त्यांच्या शिष्यांच्या पत्रांना अगदी नियमित आणि लगेच उत्तर देत असत. मी त्यांना पत्र लिहून माझा अनुभव कळवला. त्यांचे मला लगेच उत्तर आले. त्यांनी लिहिले, ‘धनंजय, त्याचा अर्थ म्हणजे तुझी साधना तुझ्या हृदयापर्यंत पोहोचली. तुला नुसते वैयक्तिक दु:ख न समजता जगाचे दु:ख समजले - त्याचे नाव आहे ‘द ग्रेट बोधिसत्त्व वे!’ हे मन जपून ठेव. एक मन जर निर्मळ असेल तर सगळे जग निर्मळ बनते. तुझे मन निर्मळ म्हणून मला तू आवडतोस!’ त्यांच्या पत्रानंतर माझ्या साधनेचे वळण बदलून गेले. साधना फक्त स्वत:साठी करायची नाही, तर सगळ्या जगासाठी करायची असते हे सुंदर सत्य माझ्या गुरूंनी शिकवले.
नुकतेच एक नवीन पुस्तक वाचनात आले- लव्ह इन एव्हरी ब्रेथ! त्याच्यात एक साधना सांगितली आणि शिकवली गेली आहे. ध्यानाला बसलात की काही वेळतरी ही साधना करावी. काय आहे ही साधना? जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा जगाचे दु:ख स्वत:मध्ये बोलवावे आणि जेव्हा तुम्ही श्वास सोडता, तेव्हा जगासाठी शांती आणि आनंद पाठवावा. किती सुंदर ही साधना! मी आठवणीने ती करतो. सान सा निम जाऊन बरीच वर्षे झाली आता. अजूनही सान सा निमची आठवण येते आणि न विसरता मी म्हणतो, ‘थँक यू , थँक यू , माय डीअर टीचर!’