झेन कथा : ‘वेदना’... पण कुणाची?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2020 01:40 AM2020-10-02T01:40:30+5:302020-10-02T01:40:59+5:30
प्रेरणादायी कथा
पाच वर्षांपूर्वी मी माझ्या दोन्ही गुडघ्यांची ‘नी रिप्लेसमेंट सर्जरी’ करून घेतली होती. माझे मित्र मला म्हणायचे, ‘दोन्ही एका वेळेला? वेडा आहेस की काय?’ - मला त्याची काही भीती नव्हती.
आॅपरेशन झाल्यानंतर तीन दिवस हॉस्पिटलमध्ये आणि नंतर एकवीस दिवस एका रिहॅब फॅसिलिटीमध्ये
राहिलो होतो. रिहॅबमध्ये दररोज सकाळी आणि दुपारी
४ तास रिहॅब म्हणजे अनेक वेगवेगळे प्रकार चालायचे. विचारू नका !
माझे मित्र मला सांगायचे, ‘अरे, काळजी घे बरंका. खूप-अगदी अतोनात वेदना होतात !’
पण माझा अनुभव वेगळाच निघाला. माझी थेरपिस्ट जे काही करायची माझ्या गुडघ्याबद्दल... मला एक गंमतच वाटायची ! दुखायचे अतोनात; पण माझं मन त्यापासून वेगळं होतं. हे माझं दुखणं आहे, असं ते मानायलाच तयार नव्हतं. मी त्याच्याकडे एक प्रकारची वेगळी भावना म्हणून बघत होतो... हे माझ्या शरीराचं दु:ख, माझं नव्हे!
माझी थेरपिस्ट शेवटी मला म्हणाली, ‘मी तुला एक विचारू? माझे अनेक पेशंटस होऊन गेले; पण कोणी आपल्या दु:खाला हसलेलं मला आठवत नाही. सांग तरी मला, काय गुपित आहे तुझं ते..’
मी म्हणालो, ‘तू प्रश्नच चुकीचा विचारतेस. तू विचारतेस व्हॉट इज द लेव्हल आॅफ युअर पेन?- तुझ्या दुखण्याची लेवल काय? आता हा प्रश्न चुकीचा का?- कारण आपण आपल्या अनुभवांशी हा ‘माझा’ अनुभव आहे ही चुकीची समजून करून जगत असतो, माही का?’
माझ्या थेरपिस्टने तेव्हापासून तिचे प्रश्न बदलले. आता ती विचारते, ‘व्हॉट इज द पेन लेव्हल?’- पाहिलंत? तिच्या प्रश्नातला ‘यूअर’ हा शब्दच तिने काढून घेतला!
आपण कामावरून घरी आल्यावर म्हणतो, ‘ओह, किती दमलोय मी आज !’- त्या वाक्यातला सगळ्यात नको असलेला शब्द म्हणजे ‘मी’.
तुम्ही कशाला येता मध्ये? तुमच्या शरीराला तो दमलेल्या अवस्थेचा अनुभव तरी घेऊ दे की!