झेन कथा - तुम्हाला काय ‘हवे’ आहे? डायोजेनीस म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2020 01:33 AM2020-09-28T01:33:07+5:302020-09-28T01:33:22+5:30
अलेक्झान्डर म्हणाला, ‘मी ठीक आहे, पण मला तुमच्यासारख्या महान ज्ञानी संताला मदत करावीशी वाटते. माझ्याकडे सर्वसत्ता आणि संपत्ती आहे. तुम्ही जे मागाल ते मी आत्ताच्या आता देऊ शकतो
धनंजय जोशी
प्रत्येक क्षणी आपल्याला काहीना काहीतरी हवे असते. आपण ज्या गोष्टींचा हव्यास किंवा पाठपुरावा करतो त्यांचे खरे स्वरूप आपल्याला समजले तर तो हव्यास आपोआप संपतो. आपले दैनंदिन जीवन अगदी साधे आणि सोपे होऊन जाते. याबद्दल सान सा निम एक गोष्ट सांगायचे. पूर्वी ग्रीसमध्ये अथेन्स शहरामध्ये डायोजेनीस नावाचा मोठा संत होऊन गेला. डायोजेनीस मोठा ज्ञानी होता, पण अगदी निरीच्छपणे राहत असे. रस्त्यावर झोपायचा. कधी कपडे घालायचा, तर कधी नाही. साधे आणि कशाचा हव्यास न बाळगणारे जीवन ही त्याची शिकवण. एकदा तो असाच झोपला असताना त्याला जरा थंडी वाजून जाग आली. त्याने डोळे उघडून बघितले तर त्याच्या पुढे उभा होता अलेक्झान्डर द ग्रेट! अलेक्झान्डर अत्यंत शक्तिशाली राजा होता. तो डायोजेनीसकडून शिकवण घेण्यासाठी आला होता. डायोजेनीस त्याच्याकडे बघून म्हणाला, ‘ओ अलेक्झान्डर द ग्रेट? कसे आहात आपण ?’
अलेक्झान्डर म्हणाला, ‘मी ठीक आहे, पण मला तुमच्यासारख्या महान ज्ञानी संताला मदत करावीशी वाटते. माझ्याकडे सर्वसत्ता आणि संपत्ती आहे. तुम्ही जे मागाल ते मी आत्ताच्या आता देऊ शकतो. जमीन, पैसा , सोने, चांदी तुम्हाला जे काय हवे ते तुम्ही फक्त मागायचे. एका क्षणार्धात मी ते तुमच्यासमोर सादर करेन. सांगा, तुम्हाला काय पाहिजे?’ डायोजेनीस म्हणाला, ‘तुम्ही मला मदत करू शकता? थँक यू सो मच !’- अलेक्झान्डरने विचारले, ‘सांगा, काय हवे तुम्हाला?’ डायोजेनीस म्हणाला, ‘अलेक्झान्डर द ग्रेट, तुम्ही माझ्या आणि उन्हाच्या मध्ये उभे आहात, मला थंडी वाजते, जरा बाजूला व्हाल का? ’
त्याची माफी मागत अलेक्झान्डर पटकन बाजूला झाला. डायोजेनीस हसून म्हणाला, ‘थँक यू , थँक यू. मला तुमच्याकडून तेवढेच पाहिजे होते.’
इतकी छोटी गोष्ट, पण खूप शिकवून जाते. डायोजेनीसला सोन्या-चांदीमधली शून्यता समजली होती.