झेन कथा - आरशात ‘काय’ दिसते?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2020 02:33 AM2020-09-30T02:33:33+5:302020-09-30T02:34:03+5:30
प्रेरणादायी कथा
धनंजय जोशी
प्रत्येक अनुभवामागे एक अंतर्गत ज्ञान असते.. त्याला इंग्लिश शब्द आहे इनसाइट ! ह्या ज्ञानाचे वेगळे पैलू दिसले किंवा वेगळे आहेत असे वाटले तरी खरी गोष्ट म्हणजे ते प्रत्यक्षात वेगळे नसतातच मुळी ! साधे उदाहरण. बुद्धाने सांगितले, ‘एव्हरीथिंग इज इम्पर्मनन्ट - सर्व काही सारखे बदलत आहे!’ बुद्धाने असेही सांगितले, ‘सी थिंग्स इन देअर ट्रू नेचर - सर्व काही सत्य स्वरूप आहे.’- सान सा निम यांना त्यांच्या एका शिष्याने विचारले, ‘हे कसे असू शकेल? सगळे नित्य बदलणारे आणि तरीही सगळे सत्यपण?’ सान सा निम यांनी त्याला फार सुंदर उत्तर दिले. ते म्हणाले, ‘तू घरी जा आणि तुझ्या बाथरूममधल्या आरश्याकडे बघ. तो जसा आहे तसाच आहे - रिकामा. म्हणजे त्या आरशामध्ये काहीही नाही. मग तू एक तांबडा चेंडू त्याच्यासमोर धर. काय दिसेल? एक तांबडा चेंडू दिसेल. मग एक पांढरा चेंडू आरश्यासमोर धर. काय दिसेल? एक पांढरा चेंडू दिसेल. एक पाण्याचे भांडे त्याच्यासमोर धर- एक पाण्याचे भांडे दिसेल. या गोष्टी बाजूला केल्यावर काय दिसेल? - काहीही नाही. म्हणजे तो आरसा स्वत:साठी काहीही ठेवत नाही. तो जसा रिकामा असतो तसाच तो राहतो. कोणी त्याच्या समोर आले तर तो फक्त त्याचेच दर्शन घडवतो. याचाच अर्थ, आरसा कशाचाही हव्यास किंवा कशाचीही अडचण न बाळगता जे आहे तसे दाखवतो. समोर आलेल्या गोष्टी बदलत गेल्या, तरी त्यामागे जो आरसा आहे तो मुक्त म्हणजे सत्यच आहे की नाही?’
आपली मने त्या आरश्यासारखी निर्मळ राहू शकत नाहीत. तांबडा चेंडू आपल्या मनातून जाऊन दुसरा चेंडू पुढे आणला तरी आपल्या मनातले त्या तांबड्या चेंडूबद्दलचे विचार थांबत नाहीत. आपण म्हणत राहतो, ‘अरे, तो तांबडा चेंडू जरा बरा होता, हलका होता. मला तो जास्त आवडला. पांढरा ठीक होता पण...’- आपल्या मनो-आरश्याचे असे खेळ कायम चालू असतात.
ते समजून येणे म्हणजेच ‘इनसाइट’ किंवा अंतर्गत ज्ञान!