जिल्ह्यातील 270 जोडप्यांना मिळणार 1 कोटी 35 लाख, असा करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2022 03:02 PM2022-02-17T15:02:32+5:302022-02-17T15:03:58+5:30
अहमदनगर : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. दोन वर्षांपासून कोरोनामुळे ...
अहमदनगर : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. दोन वर्षांपासून कोरोनामुळे हे अनुदान रखडले होते. आता जिल्हा परिषदांना हे अनुदान मिळणार असल्याने जिल्ह्यातील २७० जोडप्यांना १ कोटी ३५ लाख रुपये मिळणार आहेत.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यापैकी एकाने सवर्ण व्यक्तीशी किंवा वरील प्रवर्गात आपसात विवाह केल्यास हे अनुदान मिळते. यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अर्ज करावा लागतो.
कोणत्या वर्षात किती आंतरजातीय विवाह
वर्ष अनुदान (लाखात) लाभार्थी
२०१२-१३ ६८.५२ २७०
२०१३-१४ ७०.०० १४०
२०१४-१५ ४२.४० ८४
२०१५-१६ ५४.३५ ११५
२०१६-१७ ५३.६० ११०
२०१७-१८ ७० १३३
२०१८-१९ -- --
२०२०-२१ ६० १२०
२०२१-२२ १३५ २७०
प्रत्येक जोडप्याला ५० हजार
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून ५० हजारांचे आर्थिक साहाय्य दिले जाते. यात २०१० पूर्वी विवाह झाला असल्यास १५ हजार रुपये, तर २०१० नंतर विवाह झाला असल्यास ५० हजार रुपयांचे अनुदान जोडप्यास मिळते.
कोरोनामुळे रखडले
कोरोनामुळे शासनाकडे निधी नसल्याने दोन वर्षे अनुदान मिळण्यास विलंब झाला होता. परंतु मागील वर्षीप्रमाणे यंदाही हे अनुदान आता मिळणार आहे.
२०२१-२२ या वर्षात २७० जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार याप्रमाणे १ कोटी ३५ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. त्याची कार्यवाही सुरू आहे.
- राधाकिसन देवढे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी
असा करावा अर्ज
वधू-वराचे जातीचे दाखले, विवाह नोंदणी दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, दोघांचे रहिवास दाखले, विवाहाचे प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड, संयुक्त बँक खाते क्रमांक, विवाहाचा फोटो, दोन प्रतिष्ठितांची शिफारसपत्रे अशी कागदपत्रे जोडून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागास अर्ज केल्यानंतर शासनाकडून साधारण वर्षभरात हे अनुदान मिळते.