घोड धरणात येणार १ टीएमसी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:26 AM2021-09-15T04:26:06+5:302021-09-15T04:26:06+5:30
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील डिंबे, वडज धरणे ओव्हरफ्लो झाले असून, डिंबे धरणातून ओव्हरफ्लोचे ७ हजार ६८० तर वडज मधून ...
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील डिंबे, वडज धरणे ओव्हरफ्लो झाले असून, डिंबे धरणातून ओव्हरफ्लोचे ७ हजार ६८० तर वडज मधून २ हजार ६५५ क्युसेकने घोड नदीत पाणी सोडण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी हे पाणी घोड धरणात येऊन धडकले आहे. त्यामुळे घोड धरणातील पाणीसाठा बुधवारी सायंकाळपर्यंत ५० ते ५५ टक्के होण्याची अपेक्षा आहे.
कुकडी प्रकल्पात २२ हजार ५९६ एमसीएफटी म्हणजे ७६ टक्के पाणीसाठा झाला आहे. हा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ टक्के अधिक आहे. गेल्या वर्षी २१ हजार ५०६ एमसीएफटी म्हणजे ७२ टक्के पाणीसाठा होता.
येडगाव धरणात १ हजार २७८ एमसीएफटी (६७ टक्के), माणिकडोह धरणात ५ हजार ७७६ एमसीएफटी (५६ टक्के) वडज धरण १ हजार १७३ एमसीएफटी म्हणजे १०० टक्के भरले आहे. मीना नदीत २ हजार ६५५ क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
कुकडी प्रकल्पातील सर्वात जादा क्षमता असलेले डिंबे धरण १०० टक्के भरले धरणातून नदीत ७ हजार ६८० क्युसेकने तर दोन्ही कालव्यांना ७५० क्युसेकने पाणी सोडले आहे. पिंपळगाव जोगे धरणात १ हजार ९६८ एमसीएफटी म्हणजे ५१ टक्के भरले आहे.
घोड धरण मंगळवारी चार वाजेपर्यंत ३४ टक्के धरले आहे. येत्या चोवीस तासात धरणात एक टीएमसी पाण्याची आवक होणार आहे. त्यामुळे घोड धरणाचा पाणीसाठा ५५ टक्के होण्याची आशा आहे.
विसापूर तलावाची पाणी पातळी १० टक्क्यावर स्थिर आहे. सीना धरण ७४ टक्के भरले आहे. धरणात १ हजार ३६३ एमसीएफटी तर जामखेडचा खैरी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे.