जामखेड तालुक्यातील रस्त्यांना 10 कोटींच्या निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 01:32 PM2019-06-21T13:32:10+5:302019-06-21T13:33:27+5:30
तालुक्यातील रस्त्यांच्या नुतनीकरण कामांसाठी सुमारे 9 कोटी 75 लक्ष रूपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्याने या भागातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हळगाव : पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून सन 2019 - 20 च्या अर्थसंकल्पीय तरतुदीनुसार हळगाव परिसरासह तालुक्यातील रस्त्यांच्या नुतनीकरण कामांसाठी सुमारे 9 कोटी 75 लक्ष रूपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्याने या भागातील रस्त्यांचे प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हळगाव परिसरातील प्रजिमा 105 या मार्गावरील फक्राबाद ते कुसडगाव या रस्त्याच्या दीड किलोमीटर भागात मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी 50 लाख रुपये, प्रजिमा 104 या मार्गावरील पिंपरखेड ते मलठण या रस्त्यावरील दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी 75 लाख रुपये , राज्यमार्ग 56 वरील सीना नदी ते वाळूंजकरवस्ती या अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी दीड कोटी रुपये, तसेच प्रजिमा 72 या मार्गावरील राजुरी ते पिंपळगाव आळवा व पिंपळगाव आळवा ते आपटी या साडेपाच किलोमीटर अंतराच्या मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी दोन कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. प्रजिमा 69 या मार्गावरील वाघाफाटा ते मोरेवस्ती व जवळके फाटा ते सटवाई मंदिर या परिसरातील दोन किलोमीटर मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या कामासाठी दीड कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. राज्यमार्ग 56 वरील बीड रस्ता ते साकत या सात किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या सुधारणा कामासाठी साडेतीन कोटी रूपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे.