दहा लाखांचे बोगस बिल
By Admin | Published: September 6, 2014 11:47 PM2014-09-06T23:47:30+5:302023-06-27T10:51:18+5:30
अहमदनगर : रस्त्याच्या दुरुस्तीचे १० लाखांचे बोगस देयक महापालिकेच्या बांधकाम विभागाने अदा केल्याचा आरोप आहे़
अहमदनगर : रिलायन्स जीओ इन्फोकॉ लिमिटेड कंपनीचे केबल टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे १० लाखांचे बोगस देयक महापालिकेच्या बांधकाम विभागाने अदा केल्याचा आरोप करत ‘काम दाखवा आणि २१ हजारांचे बक्षीस मिळवा’, असे आव्हानच मनसेचे नगरसेवक किशोर डागवाले यांनी महापालिका आयुक्तांना निवेदनाव्दारे दिले आहे़
रिलायन्स कंपनीची केबल टाकण्याचे काम घेतलेल्या ठेकेदार संस्थेकडून प्रोफेसर चौक ते समर्थ नगर आणि कुष्ठधाम चौक ते गुलमोहर रस्ता परिसरातील रस्ते खोदण्यात आले़ त्यामुळे हा रस्ता उखडला गेला़ हा रस्ता दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने ९ लाख ९० हजारांचे अंदाजपत्रक तयार केले़ रस्त्याच्या दुरुस्तीचे काम महावीर संस्थेस देण्यात आले़ संबंधित संस्थेस ४ मार्च रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला़ परंतु या संस्थेने रस्ता दुरुस्तीचे काम केले नाही़ काम न करताच महापालिकेच्या बांधकाम विभागाने २७ जून रोजी संबंधित संस्थेस ९ लाख ९० हजारांचे देयक अदा केले असल्याचे मनसेचे नरसेवक कैलास गिरवले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे़
महापालिकेने काम न करताच बोगस देयक अदा केले़ प्रत्यक्षात जागेवर कुठलेही काम संस्थेने केले नाही़ मात्र देयक अदा करण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून देत गिरवले यांनी प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली़ तसेच महापालिका आयुक्त विजय कुलकर्णी यांनी काम दाखाविल्यास त्यांना २१ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे़ गिरवले यांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत आयुक्तांवर अविश्वास ठराव आणण्याची मागणी केली होती़ त्यानंतर त्यांनी आयुक्त कुलकर्णी यांना काम दाखवा आणि बक्षीस मिळवा,असे आव्हान दिले आहे़ त्यामुळे महापालिकेत मनसे विरुध्द आयुक्त, असा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत़
(प्रतिनिधी)