महिलेसह पतीवर अत्याचार प्रकरणी दहा जणांविरुध्द गुन्हा; अत्याचाराची फिर्याद मागे घेण्यासाठी केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 01:33 PM2020-03-03T13:33:20+5:302020-03-03T13:38:25+5:30
अत्याचाराची फिर्याद मागे घ्यावी, या कारणावरून महिलेसह तिच्या पतीला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.३ मार्च) रात्री उशिरा १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर : अत्याचाराची फिर्याद मागे घ्यावी, या कारणावरून महिलेसह तिच्या पतीला विवस्त्र करून मारहाण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.३ मार्च) रात्री उशिरा १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये पीडितेचा सख्खा भाऊ, चुलत सासरा व दोन दिराचा समावेश आहे. याप्रकरणी सदर पीडित महिलेने फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपींविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न, विनयभंग, अपहरण या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर तोफखाना पोलिसांनी चौकशीसाठी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये अत्याचाराची फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. हाच गुन्हा मागे घेण्यासाठी २४ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी नगर शहरातील जिल्हा रुग्णालय येथून पीडित महिला व तिचा पतीला रिक्षात बसविले. यानंतर त्यांना गुंगीचे औषध देऊन आरोपींनी त्यांना अज्ञातस्थळी नेले. त्या ठिकाणी दहा जणांनी त्यांना विवस्त्र केले. त्यानंतर अंगावर पेट्रोल टाकून पती-पत्नीला मारहाण केल्याचे सदर महिलेने म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एच.पी.मुलानी हे पुढील तपास करीत आहेत.
मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
दरम्यान सदर महिलेला मारहाण करताना करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सोमवारी व्हायरल झाला. यानंतर पोलिसांनी सदर महिलेशी संपर्क करून तिची फिर्याद दाखल करून घेतली आहे. याप्रकरणी सविस्तर तपास करून दोषींना अटक करण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सांगितले.