इंदोरीच्या नलुतार्इंनी केले १० हजार नैसर्गिक बाळंतपण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 12:25 PM2018-08-02T12:25:11+5:302018-08-02T12:33:43+5:30
सध्या ‘दहात आठ सिझर’ होत असताना ३३ वर्षात जवळपास दहा हजार नैसर्गिकरित्या बाळंतपणे करुन इंदोरी येथील नलिनी विजयकुमार जोशी यांनी परिसरात ‘प्रशिक्षीत सुईन’ म्हणून निष्काम आरोग्य सेवेचे व्रत जपले आहे.
हेमंत आवारी
अकोले : सध्या ‘दहात आठ सिझर’ होत असताना ३३ वर्षात जवळपास दहा हजार नैसर्गिकरित्या बाळंतपणे करुन इंदोरी येथील नलिनी विजयकुमार जोशी यांनी परिसरात ‘प्रशिक्षीत सुईन’ म्हणून निष्काम आरोग्य सेवेचे व्रत जपले आहे. नलुतार्इंनी तपासणी केली आणि बाळंतपणाची वेळ दिली तर त्यात अगदी तासाभराचाही फरक पडत नसायचा. असं तंतोतंत निदान त्या करीत म्हणून परिसरातील बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या महिलांच्या ‘माई’ बनल्या आहेत.
आतापर्यंत त्यांनी केलेल्या सर्व प्रसुतीतील ‘बाळ-बाळांत’ सुखरुप झाले. १९६९ ते २००२ पर्यंत या ३३ वर्षाच्या कालखंडात त्यांनी दिलेल्या सेवेला अपयश आले नाही. एकदाही सिझर करण्याची वेळ आली नाही. आजही जन्माची नोंद शोधण्यासाठी परिसरातील गावकरी त्यांच्याकडे येतात. जीर्ण झालेल्या तत्कालीन नोंद वहीतून त्या जन्मवेळ, तारीख शोधून देत आहेत.
ग्रामीण महिलांसाठी निष्काम आरोग्यसेवा देणाऱ्या ‘डॉक्टरीन बाई.. नलुताई’ म्हणून परिसरात त्या परिचत आहेत. १९६९ ला डॉ.विजयकुमार एकनाथ जोशी यांच्याशी विवाहबध्द होऊन इंदोरीत आल्या. नलिनी हिंगे (माहेरच नाव) यांनी लग्नापूर्वी नाशिक येथे परिचारिका (एम.एन.एस.) कोर्स पूर्ण केला. वैद्यकीय कारणाने डॉ.जोशी यांच्याशी त्यांची ओळख झाली आणि ओळखीचे रुपांतर रेशीमगाठीत झाले. त्यांना धुळे येथे आरोग्यसेवेत नोकरी मिळाली होती, पण आजेसासरे ‘केशव काका’ यांनी त्यांना नोकरी करु दिली नाही. आपल्या अभ्यासाचा इंदोरी परिसरातील गरिब महिलांना उपयोग होई दे! असा आग्रह त्यांना करण्यात आला. त्यांनी आजेसासºयांना गुरुस्थानी मानून आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली. ३३ वर्षे त्यांनी हे व्रत जोपासले. जवळपास १० हजार प्रसुती केल्या. एकही अपयश आले नाही. ८१ सालापर्यंत त्या रुग्णाच्या घरी जाऊन सुईन सेवा देत. त्यानंतर १९८२ ला त्यांनी छोटा दवाखाना सुरु केला. बाळंतपणाच्या सर्व आधुनिक सुविधा उपकरणे त्यांनी उपलब्ध केले. इंदोरी, रुंभोडी, मेहेंदुरी, औरंगपूर, उंचखडक, नवलेवाडी, धुमाळवाडी, अंबड, निंब्रळ, म्हाळादेवी, शेरणखेल, पिंपळगाव नाकविंदा अगदी कळस, सुगावहून प्रसुतीसाठी रुग्ण त्यांच्या दवाखान्यात येत. एकदा प्रवरेला पूर असताना होडीतून प्रवास करुन त्यांनी मेहेंदुरी येथील एका महिलेची प्रसुती वेदनेतून सुटका केली.
२००३ ला त्यांनी वार्धक्यामुळे परिचारिकेचे काम बंद केले. ७५ वर्षाच्या नलुताई व डॉ.जोशी आजही १५ बाय १२ च्या छोट्या घरात राहतात. या उभयतांनी ठरवल असते तर डॉक्टरकीतून बक्कळ पैसा कमावला असता पण त्यांनी रुग्णसेवेच व्रत जपल हे विशेष.
१९८२ पासूनच्या जन्म नोंदवह्यांची जपवणूक
एकदा रिक्षातून अकोलेहून भटक्या समाजातील एक महिला प्रसुतीसाठी त्यांच्या दवाखान्यात येत असताना वाटेत बाळंत झाली. मूल वाटेतच दगावले, पण त्यांनी दवाखान्यात आलेल्या त्या महिलेला उपचार देण्याचे टाळले नाही. त्या लोकांनी अर्भक रस्त्यात फेकून दिले आणि पोलिसांचा ससेमीरा नलुबाईना सहन करावा लागला. सर्व गावकरी नलुबार्इंच्या बाजूने उभे राहिले. पोलिसांना कारवाई मागे घ्यावी लागली. हा कटू प्रसंग सोडता त्यांनी केलेली रुग्णसेवा परिसरातील गावक-यांना भावली आहे. १९८२ पासूनच्या प्रसुती नोंदवह्या त्यांनी आजही जपून ठेवल्या आहे.