चार वर्षात नगरकरांना १०० कोटींचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 12:34 PM2018-06-14T12:34:47+5:302018-06-14T12:58:47+5:30
आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांत मल्टीनॅशनल कंपन्या व पतसंस्थांनी नगरकरांना तब्बल १०० कोटी रूपयांचा गंडा घातला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासात हा आकडा समोर आला असून, यापेक्षा कितीतरी अधिक पैशांची फसवणूक झाली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
अरूण वाघमोडे
अहमदनगर : आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून गेल्या तीन वर्षांत मल्टीनॅशनल कंपन्या व पतसंस्थांनी नगरकरांना तब्बल १०० कोटी रूपयांचा गंडा घातला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासात हा आकडा समोर आला असून, यापेक्षा कितीतरी अधिक पैशांची फसवणूक झाली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
बीएनपी, विश्वमित्रा इंडिया परिवार, एनआयसीएल, जनसहारा मल्टी अॅग्रो, मैत्रेय सुवर्णसिद्धी व रॉयल टिष्ट्वंगल स्टार क्लब या सहा कंपन्यांनी मागील चार ते पाच वर्षांत गुंतवणूकदारांची ६९ कोटी ६१ लाख ६७ हजार रूपयांची फसवूणक केली आहे.
गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदर, एफडी, बचत खाते, दामदुप्पट पैसे असे आमिष दाखवून या कंपन्यांनी एजंटांच्या माध्यमातून जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांचे पैसे घेतले. हे पैसे परत देण्याची वेळ आली तेव्हा या कंपन्यांनी आपला गाशा गुंडाळला. या सहा मल्टीनॅशनल कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल असून, आर्थिक गुन्हे शाखा या कोट्यवधी रूपयांच्या अपहाराचा तपास करत आहे़ गुंतवणूकदारांसह कंपनीत काम करणाऱ्या एजंटांचीही फसवणूक झाली आहे़ गुंतविलेले पैसे परत मिळण्याच्या आशेने दररोज अनेक जण आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात तपासाची माहिती घेण्यासाठी येत आहेत.
मल्टीनॅशनल कंपन्यांसह गेल्या तीन वर्षांत दहा पतसंस्थांचाही कोट्यवधी रूपयांचा अपहार समोर आला असून, यामध्ये प्राथमिक आकडेवारीनुसार ठेवीदारांचे ३० कोटी रूपये अडकून पडले आहेत. या पतसंस्थांविरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल झालेल्या अनेक पतसंस्थांचे अध्यक्ष व संचालक फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
आकर्षक कमिशनचे आमिष
मल्टीनॅशनल कंपन्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रथम एजंटांची साखळी तयार करतात. त्यांना आकर्षक कमिशनचे आमिष दाखविले जाते. टार्गेट पूर्ण केले तर बक्षीस इन्सेटिव्ह दिला जातो. पैशासाठी हे एजंट प्रथम नातेवाईक, नातेवाईकांचे मित्र, शेजारीपाजारी, कार्यालयातील सहकारी यांना पैसे गुंतविण्यास सांगतात. योजना समजून सांगताना कंपनीकडून मिळालेले पैसे, धनादेश, पासबूक दाखवून विश्वास संपादन केला जातो.
आर्थिक फसवणुकीचे ३८ गुन्हे दाखल
गेल्या तीन वर्षांत कोट्यवधी रूपयांच्या आर्थिक फसवणुकीचे ३८ गुन्हे दाखल झाले असून, आर्थिक गुन्हे शाखा याचा तपास करत आहे. यामध्ये पतसंस्था, गुंतवणूक कंपन्या, एटीएम फसवणूक, ग्रामपंचायत, शबरी आदिवासी विकास महामंडळाचे नाव सांगून फसवणूक आदी गुन्ह्यांचा समावेश आहे.
या कंपन्यांत अडकले पैसे
बीएनपी ३ कोटी ५२ लाख
विश्वमित्रा २ कोटी ९५ लाख
एनआयसीएल ३५ कोटी
जनसहारा मल्टी १ कोटी ४ लाख
मैत्रेय सुवर्णसिद्धी २३ कोटी
रॉयल टिष्ट्वंगल स्टार ३ कोटी १० लाख
या संस्थांकडून फसवणूक
संपदा सहकारी पतसंस्था, मार्तंड नागरी पतसंस्था, सुवर्ण नागरी पतसंस्था, सह्याद्री नागरी पतसंस्था, व्हिआरडी सिव्हील कर्मचारी पतसंस्था, श्रीनाथ मल्टीस्टेट, दातीर ग्रामीण पतसंस्था, शरणपुरी महाराज पतसंस्था, हेरंब गृहनिर्माण संस्था, धनगंगा पतसंस्था, व्यंकटेश पतसंस्था
गुंतवणूकदारांनी आमिषांना बळी पडू नये
आर्थिक गुन्हे शाखेकडे सध्या ३८ आर्थिक गुन्ह्यांचा तपास सुरू असून, यातील चार गुन्ह्यांचे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. काही गुन्ह्यांचा तपास प्रगतीपथावर आहे. मल्टीनॅशनल कंपनी, पतसंस्था अथवा चैन मार्केटिंगच्या माध्यमातून जास्त पैशांचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. गुंतवणूकदारांनी अशा आमिषांना बळी पडू नये. अशा कंपन्यांमध्ये काम करणाºया एजंटांनी आपले नातेवाईक व मित्रपरिवारांना पैसे गुंतविण्याचा आग्रह करू नये, पैसे गुंतविताना कुठल्याही आर्थिक संस्थेची विश्वासार्हता तपासून पहावी, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी दिली.