सकारात्मक... अहमदनगरात शाळा सुरू होऊन १०० दिवस; तरी एकही विद्यार्थी आढळला नाही पॉझिटिव्ह!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 05:36 AM2021-09-28T05:36:52+5:302021-09-28T05:37:37+5:30
गावकऱ्यांनी एकत्र मिळून काळजी घेतल्यानं ही किमया साधली आहे.
अहमदनगर : शाळा... मुलांसाठी जणू आनंदाचा ठेवा... मित्रांच्या भेटी... डबे खाण्याचा आनंद... मैदानावरच्या खोड्या आणि मौजमजा... पण कोरोनामुळे मुलांचा हा आनंद गेल्या दीड वर्षांपासून हिरावून घेतला आहे. परंतु, एक शाळा यास अपवाद ठरली आहे. कोरोनाकाळातही हिवरेबाजारच्या शाळेने एक-दोन नव्हे तर तब्बल १०० दिवस पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे योग्य ती काळजी घेतल्याने कोणालाही संसर्ग झालेला नाही. गावकऱ्यांनी ही किमया साधली आहे.
हिवरेबाजारचे ग्रामस्थ, पालक, शिक्षक व विद्यार्थी यांनी एकत्र येत स्व-जबाबदारीवर १५ जूनलाच इयत्ता पाचवी ते दहावीचे वर्ग सुरू केले होते. शासनाची परवानगी नसताना पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामसभेने हा निर्णय घेतला. शंभर दिवस पूर्ण झाल्याबद्दल सोमवारी गावात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ, शिक्षक यांचा मेळावा झाला. मुलांच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता. मुलांनी आपले अनुभव निबंध व कवितांमधून शब्दबद्ध केले. अनेकांनी चित्रे काढली.
हिवरेबाजारने अशी घेतली काळजी
१. मुले वर्गात येण्याअगोदर तापमान तपासले जाते आणि सॅनिटायझरने हात स्वच्छ केले जातात. २. मुलांनी शाळा आणि घरांव्यतिरिक्त कुठेही जाऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत. ३. घरातील व्यक्ती आजारी असल्यास अथवा मुलाला थंडी-ताप जाणवल्यास शाळेत न येण्याची सूचना केली जाते.
सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन
विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी एकजूट दाखवली, त्यामुळेच आम्ही शाळा भरवू शकलो. मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी गावाने हे धाडस केले. सर्व नियम पाळल्याने कुणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही.
पोपटराव पवार, राज्य कार्याध्यक्ष, आदर्श गाव समिती
कोरोनाशी लढायला शिकलो
घरी राहून आम्ही कंटाळलो होतो. मोबाइलवर ऑनलाइन वर्गात अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे आमच्या शिक्षक व गावाने जो शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला, त्याचा आनंद झाला. या १०० दिवसांत आम्ही कोरोनाशी कसे लढायचे, ते शिकलो.
तेजस खोडदे, विद्यार्थी
तज्ज्ञ काय म्हणतात....
शाळांमध्ये संसर्गाची शक्यता कमी
- शालेय विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता कमी असल्याने शाळा पुन्हा सुरू करण्यास हरकत नाही, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी व्यक्त केले आहे.
- लहान मुलांमध्ये प्रौढ व्यक्तींइतक्याच अँटिबॉडीज निर्माण झाल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने केलेल्या चौथ्या सिरो सर्वेक्षणात आढळून आले होते. हे लक्षात घेता सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून, स्वच्छता राखून शाळा पुन्हा सुरू करायला हरकत नाही, असे स्वामीनाथन म्हणाल्या.