पेन्शन परतीच्या नोटिशीला १० हजार करदात्या शेतकऱ्यांचा ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:15 AM2021-06-01T04:15:54+5:302021-06-01T04:15:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : पंतप्रधान किसान पेन्शन योजनेचा लाभ घेतलेल्या करदात्या शेतकऱ्यांकडून पैसे परत मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : पंतप्रधान किसान पेन्शन योजनेचा लाभ घेतलेल्या करदात्या शेतकऱ्यांकडून पैसे परत मागविण्यात येत आहेत. जिल्ह्यातील १५ हजार करदात्या शेतकऱ्यांना महसूल विभागाने नोटिसा बजावल्या असून, पाच हजार शेतकऱ्यांनी इमानेइतबारे पैसे परत केले आहेत. मात्र, दहा हजार करदात्या शेतकऱ्यांनी परतीच्या नोटिशीला ठेंगा दाखविला आहे.
सन २०१९ मध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान पेन्शन योजना सुरू केली. वर्षाला ६ हजार रुपयांची पेन्शन शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणे, असे योजनेचे स्वरूप आहे. नाव नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळतो. सुरुवातीला गावपातळीवर नाव नोंदणी करून योजनेचा लाभ दिला गेला. त्यानंतर ही योजना आधार कार्डशी जोडली गेली. यातून कर भरणाऱ्या शेतकऱ्यांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. त्यामुळे सरकारी यंत्रणा कामाला लागली. संपूर्ण योजनेची विविध पातळींवर फेर तपासणी केली गेली. त्यामुळे हजारो शेतकरी अपात्र ठरले. यामध्ये सर्वाधिक संख्या कर भरणाऱ्या शेतकऱ्यांची आहे. करदात्या शेतकऱ्यांसह अपात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांकडून पैसे परत घेण्याची मोहीम राबविली जात आहे; परंतु त्यास प्रतिसाद मिळत नाही. योजनेसाठी जिल्ह्यातील ७ लाख ६४४ शेतकरी पात्र ठरले असून, त्यांना नियमित लाभ दिला जात आहे. यापैकी ४१ हजार ८६१ शेतकरी अपात्र ठरविण्यात आले असून, त्यांच्याकडून २५ कोटी ७८ लाख रुपये परत घेण्याची कार्यवाही सुरू आहे. यापैकी करदात्या शेतकऱ्यांची संख्या १५ हजार १८९ इतकी आहे. जिल्ह्यातील ५ हजार १३८ करदात्या शेतकऱ्यांनी ४ कोटी ४९ लाख शासनाला परत केले आहेत; परंतु १० हजार शेतकऱ्यांनी अद्याप पैसे परत केलेले नाही. त्यांच्याकडून पैसे परत करण्याची कार्यवाही सुरू आहे; परंतु सध्या लॉकडाऊन असल्याने ही कार्यवाही थांबली आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर वसुलीची मोहीम गाव पातळीवर राबविली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
......
पीएम किसान योजनेचे एकूण लाभार्थी
७ लाख ६४४
.......
पैसा परता करा म्हणून नोटीस पाठविलेले शेतकरी
४१ हजार ८६१
......
पैसे परत करणे बाकी असलेले शेतकरी
२९ हजार ३१३
.....
आतापर्यंत पैसे परत केलेले शेतकरी
१२ हजार ५४८
.....
आतापर्यंत ९ कोटी ६६ लाख वसूल
जिल्ह्यातील अपात्र १२ हजार ५४८ शेतकऱ्यांकडून ९ कोटी ६६ लाख ४० हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत. उर्वरित २९ हजार शेतकऱ्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्यांच्याकडून १६ कोटी ११ लाख ९२ हजार रुपये वसूल केले जाणार आहेत. ही रक्कम वसूल करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून तहसीलदारांची नेमणूक करण्यात आली आहे.
......
करदात्या शेतकऱ्यांकडे ११ कोटी
जिल्ह्यातील १० हजार करदात्या शेतकऱ्यांना पैसे परत करण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत; परंतु १० हजार शेतकऱ्यांनी अद्याप पैसे परत केले नसून, त्यांच्याकडे केंद्राचे ११ कोटी ५८ लाख रुपये थकीत आहेत.
....
बँकांमार्फत वसुलीस परवानगी
पंतप्रधान किसान पेन्शन योजनेची रक्कम परत न करणाऱ्या अपात्र शेतकऱ्यांकडून पैसे वसूल करण्याची मोहीम सुरू आहे; परंतु ठोस कारवाईची तरतूद नव्हती. त्यामुळे वसुली रखडली होती. केंद्र सरकारने आता बँकांकडून ही रक्कम वसूल करण्यास परवानगी दिली आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बँकांमार्फत वसुली केली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
.....
जिल्हा प्रशासनाचा दिल्लीत गौरव
पंतप्रधान किसान योजनेंच्या लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष घरी जाऊन तपासणी करण्यात अहमदनगर जिल्ह्याने आघाडी घेतली होती. केंद्राने दिलेल्या मुदत जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने जिल्ह्यातील २८ हजार ८०२ शेतकऱ्यांची तपासणी केली होती. त्यामुळे केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाचा गौरव करण्यात आला.
...
डमी