नगरमध्ये रुग्णालयात अग्नितांडव, 11 मृत्युमुखी; मृतांमध्ये कोरोना रुग्णांचा समावेश, सहा जण अत्यवस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 06:36 AM2021-11-07T06:36:33+5:302021-11-07T06:52:33+5:30
ऐन दिवाळीतील दुर्घटनेने राज्य हादरले, मृतांमध्ये कोरोना रुग्णांचा समावेश, सहा जण अत्यवस्थ, चौकशीचे आदेश
अहमदनगर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता कक्षाला शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. या दुर्घटनेत कोरोनावर उपचार घेणाऱ्या ११ रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांत चार महिला व सात पुरुषांचा समावेश आहे. सहा रुग्ण जखमींवर उपचार सुरू आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे.
गेल्या वर्षी कोरोना रुग्णांसाठी अतिदक्षता विभाग सुरू केला होता. तेथे १७ रुग्ण उपचार घेत होते. आगीचे लोट पाहून रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ उडाली. कर्मचारी व नातेवाईकांनी रुग्णांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तोपर्यंत रुग्ण भाजून गंभीर जखमी झाले होते.
महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ आग विझवली. रुग्णांना कक्षातून जवळच असलेल्या प्रसूती कक्षात हलविले. काही रुग्ण व्हेंटिलेटर तर काही ऑक्सिजनवर होते. आगीत ते जळून खाक झाले. रुग्णांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेची विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ अधिकाऱयांची समिती चौकशी करेल, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख
ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत जीव गमावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत जाही करण्यात येत असून दुर्घटनेची चौकशी जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येईल. चौकशी अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देश दिले आहेत.
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री
मुख्यमंत्र्यांकडून दखल
आगीच्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
मृत्यू होरपळून की गुदमरून, हे तपासू
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. आगीच्या कारणाची चौकशी केली जाईल. ११ जणांचा मृत्यू झाला आहे. अतिदक्षता कक्षाचे फायर ऑडिट करण्यात आले होते. रुग्णांचा होरपळून की गुदमरून मृत्यू झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच निष्पन्न होईल.
- डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी, अहमदनगर