जिल्ह्यात ११ लाख ७६ हजार विद्यार्थ्यांना देणार जंतनाशक गोळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:26 AM2021-02-27T04:26:40+5:302021-02-27T04:26:40+5:30
अहमदनगर : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १ ते ८ मार्चदरम्यान जंतनाशक अभियानाद्वारे जिल्ह्यातील १ ते १९ वयाच्या मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे ...
अहमदनगर : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १ ते ८ मार्चदरम्यान जंतनाशक अभियानाद्वारे जिल्ह्यातील १ ते १९ वयाच्या मुला-मुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी २१ लाख ३७ हजार १८२ जंतनाशक गोळ्यांचा साठा जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ११ लाख ७६ हजार २७९ मुला-मुलींना गोळ्या देण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात १ ते १४ वयोगटातील अंदाजे २८ टक्के मुलांना आतड्यांमध्ये वाढणाऱ्या परजीवी जंतापासून धोका आहे. राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा उद्देश १ ते १४ वयोगटातील सर्व मुलामुलींना अंगणवाडी, शाळा या ठिकाणी जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे तसेच पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे.
मोहिमेच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, नगरपालिका दवाखाने व महानगरपालिका येथील सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
राष्ट्रीय जंतनाशक दिनी म्हणजेच १ मार्च रोजी शाळेमधील ६ वर्ष ते १९ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये १ ते ६ वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना तसेच शाळाबाह्य लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जे लाभार्थी सदर दिवशी आजारी असतील किंवा इतर कारणामुळे गोळी घेणे शक्य झाले नाही, त्यांना ८ मार्च रोजी शाळा व अंगणवाडी केंद्रामध्ये गोळी देण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले.
...................
...तर घरोघरी पाेहोच करणार गोळी
१ मार्च ते ८ मार्च या दरम्यान १ ली ते १२ वीचे विद्यार्थी कोरोनामुळे शाळेत जाऊ शकले नाहीत तर अशा शाळेत न जाणाऱ्या मुलामुलींना आशा, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक त्यांच्या कार्यक्षेत्रात घरोघरी जाऊन जंतनाशक गोळी लाभार्थ्यांना खायला देणार आहेत.
..................
मुलांची शारीरिक, बौद्धिक वाढ खुंटू शकते
वैयक्तिक व परिसर स्वच्छता नसल्यास जंताचे त्रास उद्भवू शकतात. या कृमीदोषांचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक स्वरूपाचा असून मुलांना कमजोर करणारा आहे. कृमीदोषामुळे रक्तक्षय, कुपोषणाबरोबरच मुलांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे प्रकारही होऊ शकतात, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
............
रक्तक्षयाचे प्रमाण मुलींमध्ये सर्वाधिक
भारतात ६ ते ५९ महिन्यांच्या वयोगटातील प्रत्येक १० बालकांमागे ७ बालकांमध्ये रक्तक्षय आढळतो. ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक असू शकते. तसेच १५ ते १९ वर्ष वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. त्यामुळे या गोळ्यांचे सेवन गरजेचे आहे, असे सांगण्यात आले.
..................
एकूण अंगणवाड्या - ५६७९
विद्यार्थी संख्या - २९६०९५
एकूण शाळा - ५१७८
विद्यार्थी संख्या - ८८०१८४