वेश्या व्यवसाय चालविणा-यांचा पोलिस पथकावर हल्ला : पाच महिलांसह ११ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 06:13 PM2019-07-12T18:13:35+5:302019-07-12T18:16:02+5:30
वेश्या व्यवसायावर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिस पथकावर आरोपींनी दगडाने हल्ला करत त्यांना जखमी केले़
अहमदनगर : वेश्या व्यवसायावर कारवाई करण्यास गेलेल्या पोलिस पथकावर आरोपींनी दगडाने हल्ला करत त्यांना जखमी केले़ नगर-औरंगाबाद रोडवरील पांढरीपूल येथे हॉटेल जय मल्हार येथे शुक्रवारी दुपारी दीड वाजता ही घटना घडली़
या मारहाणीत पोलिस कॉस्टेबल सिद्धार्थ घुसळे व अक्षयकुमार वडते हे जखमी झाले आहेत़ पोलिसांनी घटनास्थळावरून पाच महिलांसह अकरा जणांना अटक केली आहे़ पांढरीपूल येथील हॉटेल जयमल्हार येथील पत्र्याच्या शेडमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक मनिषक कलवानिया यांना मिळाली होती़ माहितीनुसार या ठिकाणी शुक्रवारी दुपारी पोलिस हेड कॉस्टेबल सय्यद, सहाय्यक फौजदार निसार शेख, अरकल, पोलिस नाईक करांडे, नाकाडे, गणेश धुमाळ, आव्हाड, जाधव, एऩपी गोडे, यु़ए़ राठोड, एऩए़ भुजबळ, बिरुटे, सिद्धार्थ घुसळे, अक्षयकुमार वडते, आऱआऱ ठोंबे हे पथक कारवाईस गेले होते़ घटनास्थळी पोलिसांना पाच महिला व सहा पुरुष मिळून आले़ यावेळी पोलिस आरोपींना ताब्यात घेत असताना वेश्या व्यवसाय चालविणारे गंगाराम जानकू काळे व रशिद सरदार शेख हे तेथून पळून जाऊ लागले़ त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा काळे याने हेड कॉस्टेबल घुसळे यांच्या डोक्यात दगड मारला तर रशिद याने पोलिस हेड कॉस्टेबल वडते यांना लाथाबुक्याने मारहाण केली़ या मारहाणीत दोघे पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत़
पोलिसांनी पळणाऱ्या गंगाराम काळे, रशिद शेख यांच्यासह अन्सार गफूर शेख(राख़ोसपुरी ता़ नगर), वाजिद नसीर शेख (वय ३९ रा़सावता नगर ता़ नगर), मन्सूर रहमानभाई पठाण (वय ४२ रा़ मिरी ता़ पाथर्डी), बाबा निजाम शेख (वय ४६रा़ खोसपुरी) यांच्यासह पाच महिलांना ताब्यात घेतले आहे़ याप्रकरणी आरोपींविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पांढरीपुल परिसरात अवैध व्यवसायिकांचा सुळसुळाट
नगर-औरंगाबाद महामार्गावरील पांढरीपूल येथे जुगार क्लब, मटका व वेश्या व्यवसाय असे विविध स्वरुपांचे अवैध व्यवसाय सुरू आहेत़ रस्त्यात अडवून प्रवाशांना लुटण्याच्याही घटना या परिसरात मोठ्या प्रमाणात घडत आहेत़ येथील अवैध व्यवसायांमुळे परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे़