नगर तालुक्यातील १ हजार १२६ आदिवासींना मिळाला ‘आधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:17 AM2021-07-17T04:17:12+5:302021-07-17T04:17:12+5:30
केडगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने नगर तालुक्यातील ९६ गावांतील १ हजार १२६ आदिवासी लाभार्थींना ...
केडगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने नगर तालुक्यातील ९६ गावांतील १ हजार १२६ आदिवासी लाभार्थींना अनुदानाचा लाभ मिळाला आहे. कोरोना काळात उत्पन्नाचे स्रोत बंद झाल्याने अडचणीत आलेल्या आदिवासी बांधवांना या योजनेमुळे ‘आधार’ मिळाला आहे.
कोविडमुळे सततचे लॉकडाऊन, त्यात बंद झालेले रोजंदारीचे मार्ग यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या आदिवासी कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने आदिवासी खावटी अनुदान योजना सुरू करण्यात आली. मात्र या योजनेच्या निकषात बसणाऱ्या लाभार्थींची नावे निश्चित नसल्याने या विभागामार्फत नगरपंचायत समितीला पत्रव्यवहार करून तालुक्यातील लाभार्थी शोधण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.
यानुसार सभापती सुरेखा गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी पंचायत समितीत ग्रामसेवकांची बैठक घेऊन या योजनेच्या निकषात बसणाऱ्या आदिवासींची यादी तयार करण्यास सांगितली. गावपातळीवर या योजनेच्या लाभासाठी शोध घेतल्यानंतर तालुक्यातील ९६ गावांत १ हजार १२६ लाभार्थी मिळून आले. त्या सर्वांच्या कागदपत्रांची जमवाजमव करून त्यांचा प्रस्ताव राजूरच्या आदिवासी विकास विभागाकडे सादर करण्यात आला.
या सर्वांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, तालुक्यातील १ हजार लाभार्थींना त्या योजनेचा प्रत्यक्ष लाभही मिळाला आहे. या योजनेतून आदिवासींना आधार म्हणून दोन हजार रुपये व दोन हजार रुपये किमतीच्या किराणा वस्तूंचे वितरण करण्यात येत आहे. तालुक्यातील निंबळक, हिंगणगाव, जखणगाव, खातगाव, टाकळी, नेप्ती, निमगाव घाणा, खारेकर्जुने आदी गावांत याचे वितरणही झाले.
---
काय आहेत योजनेचे निकष?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तो भा रतीय आदिवासी असावा. तो भूमिहीन असावा. त्याने रोजगार हमी योजनेवर काम केलेले असावे. तसेच घटस्फोटित महिला, विधवा महिला, निराधार, परित्यक्ता अशांना याचा लाभ मिळतो.
---
आदिवासी कुटुंबांना आधार म्हणून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे आणखीही कोणी लाभार्थी असतील तर त्यांनी ग्रामसेवकांशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त आदिवासींना याचा लाभ मिळण्यासाठी आदिवासी विकास विभाग प्रयत्नशील आहे.
-संतोष ठुबे,
प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास प्रकल्प, राजूर
----
कोरोनाकाळात अनेक आदिवासी बांधवांचे रोजगार बुडाले. त्यांना याचा लाभ मिळावा म्हणून पंचायत समितीमार्फत सभापती सुरेखा गुंड यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे सर्व सदस्य, अधिकारी, ग्रामसेवक, सरपंचांनी प्रयत्न केले. अजूनही कोणी लाभार्थी असेल तर ग्रामसेवकांशी संपर्क करावा.
-दिलीप पवार,
उपसभापती, पंचायत समिती, नगर
160721\img-20210716-wa0069.jpg
आदिवासी योजना फोटो