कारखानदारांनी थकविले नवनागापूरचे १२ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:15 AM2021-06-26T04:15:46+5:302021-06-26T04:15:46+5:30
अहमदनगर : नवनागापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या कारखान्यांनी ग्रामपंचायतीचा १२ कोटी २२ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. गेल्या ९ ...
अहमदनगर : नवनागापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या कारखान्यांनी ग्रामपंचायतीचा १२ कोटी २२ लाख रुपयांचा मालमत्ता कर थकविला आहे. गेल्या ९ वर्षांपासून हा कर कारखान्यांनी भरलेला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने एमआयडीसी महामंडळाला ही थकीत करवसुली करण्याचे साकडे घालण्यात आले आहे.
एमआयडीसी क्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतींना कारखान्यांकडून कर वसुलीसाठी मोठ्या अडचणी येत होत्या. अनेक कारखाने वर्षानुवर्ष कर भरत नाहीत. त्यामुळे अनेकदा कारखाना व ग्रामपंचायत यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सरकारने १३ सप्टेंबर २०१९ रोजी आदेश काढून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानेच कारखान्यांकडील कर वसुली करावी व त्यातील ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यात वर्ग करावी, असा आदेश काढला आहे. मात्र, हा आदेश निघाल्यापासून अद्यापपर्यंत एमआयडीसीने कारखान्यांकडील थकीत रकमेची वसुली केलेली नाही. त्यामुळे नवनागापूरचे सरपंच डॉ. बबनराव डोंगरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांनी महामंडाळाला पत्र देत कारखान्यांकडील ग्रामपंचायतीचा थकीत कर वसूल करावा, असे साकडे घातले.
..................
थकीत रक्कम - १२ कोटी २२ लाख ३२ हजार ६२७
वर्ष - २०११-१२ पासून २०२१ पर्यंत
...............
एकूण आस्थापना
६७२
...........
कारखान्यांकडून मिळणारा कर
२ कोटी ७६ लाख (वार्षिक)
................
२५ नवनागापूर निवेदन
एमआयडीसी कार्यालयातील कर्मचारी ज्योती आस्थेकर, एस. डी. पवार यांच्याकडे कर वसुलीसाठीचे पत्र देताना नवनागापूर ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ. बबनराव डोंगरे. समवेत सदस्य सागर सप्रे, संजय चव्हाण, ग्रामविकास अधिकारी संजय मिसाळ आदी.