मुळा कारखान्याचे १२ लाख ९३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:22 AM2021-05-06T04:22:10+5:302021-05-06T04:22:10+5:30
नेवासा : मुळा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात १२ लाख ९३ हजार ५०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. मंगळवारी ...
नेवासा : मुळा सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या हंगामात १२ लाख ९३ हजार ५०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले. मंगळवारी गळीत हंगामाची सांगता करण्यात आली.
कोरोनाच्या काळातील सर्व बंधने पाळून कारखान्याचे चीफ इंजिनिअर मुकुंद ठोंबरे व मुख्य शेतकी अधिकारी विजय फाटके यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. यावेळी कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, संचालक बाबूराव चौधरी, बाळासाहेब बनकर, बबनराव दरंदले, कार्यकारी संचालक शरद बेल्हेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
धरणातील पाण्याचा पुरेसा साठा व पाऊसमान व्यवस्थित झाल्याने कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढले होते. उसाचे विक्रमी उत्पादन झाले होते. मागच्या वर्षी मशिनरीत काही तांत्रिक सुधारणा केल्यामुळे यंदाच्या हंगामात रोज आठ ते साडेआठ हजार मे. टन क्षमतेने गळीत घेऊन कारखाना चालविला. कारखान्याचा गळीत हंगाम सुरुवातीपासून शेवटपर्यंत अत्यंत सुरळीतपणे चालविला. यंदा उसाचे सर्वाधिक गळीत झाल्याची माहिती अध्यक्ष तुवर यांनी दिली.
सर्व उसाचे गाळप केल्याशिवाय कारखान्याचा गळीत हंगाम बंद केला जाणार नाही, असा शब्द मंत्री शंकरराव गडाख यांनी दिला होता. तो शब्द पाळला व सर्व उसाचे विक्रमी गाळप केल्यावरच कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता केल्याचे तुवर यांनी सांगितले.
तसेच ६० लाख लिटर अल्कोहोलची निर्मिती करण्यात आली. त्यापैकी ५० लाख लिटर अल्कोहोल बनविण्यासाठी शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन बी-हेवी मोलॅसेसचा कच्चामाल म्हणून वापर करण्यात आला. त्याव्यतिरिक्त आणखी ५० हजार टन बी-हेवी मोलॅसेसची थेट विक्री करण्यात आली. कारखान्याच्या वीज प्रकल्पातही एकूण ३९ कोटी रुपयांची वीजनिर्मिती करण्यात आली. त्यापैकी कारखान्याच्या विविध प्रकल्पांसाठी विजेचा वापर करून जवळपास २३ कोटी रुपयांची वीज महावितरणला विक्री करण्यात आली आहे.