एरंडाच्या बिया खाल्याने घुलेवाडी शाळेतील १२ विद्यार्थ्यांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:29 PM2017-12-19T12:29:55+5:302017-12-19T12:31:25+5:30
घुलेवाडी (ता. भूम, जि. उस्मानाबाद) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने १२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात या विद्यार्थ्यांवर उपचार करुन त्यांना रात्री उशीरा त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले.
जामखेड : घुलेवाडी (ता. भूम, जि. उस्मानाबाद) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एरंडाच्या बिया खाल्ल्याने १२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात या विद्यार्थ्यांवर उपचार करुन त्यांना रात्री उशीरा त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले.
घुलेवाडी प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीचे विद्यार्थी दुपारी एकच्या सुमारास शालेय पोषण आहारातील भात खाल्यानंतर शाळेच्या परिसरात खेळत होते. शिक्षक जेवण करीत होते़ त्याचवेळी शाळेच्या बाहेरील बाजूस खेळत असलेल्या १२ विद्यार्थ्यांनी बदाम समजून एरंडाच्या बिया खाल्या. त्यानंतर त्यांनी दिड तासाने या विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तेथील रहिवाशी व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मोटारसायकलवर खर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. खर्डा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय ठाकरे यांनी मुलांवर प्राथमिक उपचार करुन तात्काळ जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात १०८ रुग्णवाहिकेद्वारे पाठविले.
तुषार खामकर (वय ६), आदित्य जायभाय (वय ८), प्रेमानंद घुले (वय ९), विकास गायकवाड (वय ७), काकासाहेब गोपाळघरे (वय ९), अजय गोपाळघरे (वय ७), आदित्य डोंगरे (वय ६), अस्मिता डोंगरे (वय ७), दिक्षा डोंगरे (वय ९), राधा घुले (वय ९), ऋतुजा घुले (वय १०), स्नेहा घुले (वय ९) या विद्यार्थ्यांना जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे, डॉ. संजय ठाकरे यांनी विद्यार्थ्यांवर उपचार केले. रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर झाली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले.