छावणी चालकांचे १३ कोटी रुपये थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:32 AM2021-02-23T04:32:22+5:302021-02-23T04:32:22+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील चारा छावण्यांचे २०१९ मधील ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यातील १२० छावणी चालकांचे तब्बल १३ कोटी रुपयांची बिले ...

13 crore for camp drivers | छावणी चालकांचे १३ कोटी रुपये थकले

छावणी चालकांचे १३ कोटी रुपये थकले

अहमदनगर : जिल्ह्यातील चारा छावण्यांचे २०१९ मधील ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यातील १२० छावणी चालकांचे तब्बल १३ कोटी रुपयांची बिले अद्याप थकलेली आहेत. पाठपुरावा करूनही थकीत बिले मिळत नसल्याने चारा छावणी चालक आर्थिक संकटात सापडले आहेत. एका छावणी चालक असलेल्या सिद्धार्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषण केले. कोरोनामुळे सर्वच निधींवर टाच आल्याने अद्याप राज्य शासनाकडून पैसे आले नसल्याने जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दुष्काळामुळे २०१९ मध्ये जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यात आल्या होत्या. या छावणी चालकांचे अनुदान दरमहा दिले जात होते. सप्टेंबर २०१९ मध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने छावण्या बंद करण्यात आल्या होत्या. ३१ जुलैपर्यंतची सर्व बिले छावणी चालकांना मिळाली होती. मात्र ऑगस्ट व सप्टेंबर-२०१९ मधील दोन महिन्यांची बिलेच अद्याप मिळाली नाहीत. त्यासाठी छावणी चालक सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र गतवर्षीच्या मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि राज्य शासनाने सर्वच निधीवर बंधने आणली. त्यामुळे छावणी चालकांची बिलेही रखडली.

---------

छावणी चालकांची अशी थकली रक्कम

ऑगस्ट-२०१९ मध्ये एकूण ९७ छावणी चालकांचे अनुदान रखडले आहे. त्यामध्ये पाथर्डी (२९), शेवगाव (२३), कर्जत (४०), जामखेड (५) येथील छावण्यांचा समावेश आहे. सप्टेंबरमध्ये केवळ कर्जत तालुक्यातील २३ छावण्यांचे अनुदान थकले आहे. एकूण थकलेल्या अनुदानाची रक्कम ही १३ कोटी २९ लाख ९३ हजार २०३ रुपये इतकी आहे. या ९७ छावण्यांमध्ये ऑगस्टमध्ये १ लाख ७ हजार ४६७ लहान जनावरे, तर १० लाख ४३ हजार ७९८ छोटी जनावरे होती. सप्टेंबरमध्ये २३ छावण्यांमध्ये १६ हजार ६२८ लहान तर २ लाख २० हजार ७७० इतकी मोठी जनावरे होती.

---------------

पाथर्डी तालुक्यातील छावणी चालकांचे उपोषण

मोहोज खुर्द (ता. पाथर्डी) येथे चारा छावणीचे थकीत बिल त्वरित मिळण्याच्या मागणीसाठी सिद्धार्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपोषण करण्यात आले. या उपोषणात संस्थेचे चेअरमन जे.बी. वांढेकर, संचालिका लताबाई वांढेकर, रामनाथ म्हस्के, मंदाबाई वांढेकर, मंगल सोनवणे सहभागी झाले होते. संस्थेने १ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०१९ दरम्यान पाथर्डी उपविभागीय अधिकारी यांनी छावणीला परवानगी दिली होती. महसूल व वनविभाग यांच्याकडील शासन निर्णयाच्या आदेशाला अधीन राहून १५० जनावरांची अट शिथिल करून संस्थेला छावणीची परवानगी देण्यात आली होती. शासन निर्णयाप्रमाणे मुदतवाढ दिल्यानंतर छावणी सुरू होती. तहसीलदारांकडे रक्कम जमा असूनही मिळत नसल्याची संस्थेची तक्रार आहे. दरम्यान सदर संस्थेने मुदतवाढ दिल्यानंतरच्या पुढील काळात छावणी सुरू करण्याबाबत प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती. तसेच मंजुरीसाठी कोणताही प्रस्ताव पाठविला नव्हता, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘लोकमत’ला सांगितले.

--------------

फोटो- साजीद शेख

मोहोज खुर्द (ता. पाथर्डी) येथे चारा छावणी चालवून देखील त्याचे बिल अद्यापि मिळाले नसल्याने, सदरील बिल त्वरित मिळण्याच्या मागणीसाठी सिद्धार्थ सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जवळील भूजल सर्वेक्षण कार्यालयाच्या आवारात उपोषण करताना संस्थेचे चेअरमन जे.बी. वांढेकर, संचालिका लताबाई वांढेकर, रामनाथ म्हस्के, मंदाबाई वांढेकर, मंगल सोनवणे आदी.

Web Title: 13 crore for camp drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.