चारा छावणी चालकांचे १३ कोटी मिळाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:22 AM2021-04-01T04:22:28+5:302021-04-01T04:22:28+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील चारा छावण्यांचे २०१९ मधील सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामधील १२० छावणी चालकांचे १३ कोटी रुपये थकले होते. ...
अहमदनगर : जिल्ह्यातील चारा छावण्यांचे २०१९ मधील सप्टेंबर, ऑक्टोबर या महिन्यामधील १२० छावणी चालकांचे १३ कोटी रुपये थकले होते. ही अनुदानाची रक्कम जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली असून, संबंधित छावणी चालकांना तात्काळ अनुदान वाटप करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी दिली.
२०१८ च्या खरीप हंगामात सरासरी पर्जन्यमान कमी झाले होते. जिल्ह्यात पशुधनाची संख्या जास्त होती. त्यामुळे जिल्ह्यात चाराटंचाई झाली होती. ३१ जुलै २०१९ पर्यंतची बिले सर्व छावणी चालकांना मिळाली होती. मात्र, सप्टेंबर-ऑक्टोबर २०१९ मधील दोन महिन्यांचे १३ कोटी रुपये थकले होते. त्यानुसार प्रशासनाने राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. मात्र, कोरोनामुळे ही रक्कम वर्ग झाली नाही. दरम्यान, राज्य शासनाने बीडीएसप्रणालीवर १३ कोटी २९ लाख ९३ हजार रुपये इतके अनुदान उपलब्ध करून दिले आहे. जेवढी मागणी केली, तेवढी रक्कम प्राप्त झाल्याने प्रशासनानेही समाधान व्यक्त केले आहे.
---
चारा छावण्यांचे अनुदान
एकूण १२० छावणी चालकांचे १३ कोटी २९ लाख ९१ हजार रुपयांचे अनुदान थकले होते. सप्टेंबर २०१९ मध्ये पाथर्डी (२९), शेवगाव (२३), कर्जत (४०), जामखेड (५) येथील छावण्यांचा समावेश होता. या छावण्यांमध्ये १ लाख ७ हजार ४६७ लहान जनावरे, तर १० लाख ४३ हजार ७१८ मोठी जनावरे होती. ऑक्टोबरमध्ये एकट्या कर्जत तालुक्यातील २३ छावण्यांमध्ये १६ हजार ६२८ लहान, तर २ लाख ४९ हजार ४२० इतकी मोठी जनावरे होती.